विवोने अलीकडेच लाँच केलेल्या यू २० या स्मार्टफोनची ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर केली आहे.
अलीकडेच विवो यू २० हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला होता. आता याच स्मार्टफोनला ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेजच्या स्वरूपात भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य १८,९९० रूपये असले तरी प्रारंभी यावर एक हजाराची सवलत मिळणार असल्याने हे मॉडेल ग्राहकांना १७,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. ग्राहकांसाठी ही आवृत्ती अमेझॉन इंडियासह विवोच्या देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आलेली आहे.
विवो यू २० या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६७५ हा प्रोसेसर दिलेला असून याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यात पीडीएएफ सेन्सर आणि नाईट मोडची सुविधा दिलेली आहे. याला वाईड अँगलने युक्त ८ मेगापिक्सल्स तर २ मेगापिक्सल्सचा सुपर मायक्रो शॉट कॅमेर्यांची जोड प्रदान करण्यात आली आहे. या तिन्ही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यातील बॅटरी ५००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ९ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.