दणदणीत फिचर्सने युक्त मॅकबुक प्रो लाँच

0

अ‍ॅपलने आपले मॅकबुक प्रो या लॅपटॉपचे नवीन मॉडेल लाँच केले असून यात मोठा डिस्प्ले, शक्तीशाली प्रोसेसरसह अनेक सरस फिचर्स आहेत.

मॅकबुक प्रो या मॉडेलचे विविध व्हेरियंट बाजारपेठेत सादर करण्यात आले आहेत. यात १६ इंच आकारमानाचा आणि ३०७२ बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा रेटीना डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात इंटेलचे नवव्या पिढीतील अतिशय वेगवान प्रोसेसर्स दिलेले आहेत. याला ग्राफीक्स प्रोसेसरची जोडदेखील दिलेली आहे. डॉल्बी अ‍ॅटमॉस प्रणालीने सज्ज असणारी यातील ध्वनी प्रणाली सहा स्पीकर्सने सज्ज आहे. याच्या मदतीने अतिशय दर्जेदार श्रवणानुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात १०० वॅट क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ११ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलमध्ये अद्ययावत मॅजीक कि-बोर्ड असून तो आधीपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मॅकबुक प्रो या मॉडेलमध्ये कनेक्टीव्हिटीसाठी चार थंडरबोल्ट, तीन युएसबी टाईप-सी पोर्ट आणि हेडफोन जॅक देण्यात आलेला आहे. तसेच ब्ल्यु-टुथ व वाय-फायचे पर्यायदेखील आहेच. या मॉडेलमध्ये टच-बार, टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फोर्स टच ट्रॅकपॅड आदी सुविधा दिलेल्या आहेत. याचे विविध व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. यातील बेस मॉडेल हे नवव्या पिढीतील कोअर आय-७ प्रोसेसरने युक्त असून यात १६ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेज दिलेले आहे. तर यातील सर्वोच्च व्हेरियंटमध्ये तब्बल ६४ जीबी रॅम व १ टेराबाईट स्टोअरेज प्रदान करण्यात आलेले आहे. याचे मूल्य १.९९ लाख रूपयांपासून सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here