दोन व्हेरियंटमध्ये मिळणार नोकिया ७.२ स्मार्टफोन

0

एचएमडी ग्लोबलने नोकिया ७.२ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला असून याला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने अलीकडेच नोकिया ७.२ या मॉडेलचे अनावरण केले होते. हा स्मार्टफोन आधीच बाजारपेठेत असणार्‍या नोकिया ७.१ ची पुढील आवृत्ती आहे. आता हाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. याला ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे १८,५९९ आणि १९,५९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरपासून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.

नोकिया ७.२ या मॉडेलमध्ये दर्जेदार कॅमेरे प्रदान करण्यात आले आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा आणि फेज डिटेक्शन फिचरने सज्ज आहे. याला ८ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगलयुक्त तर ५ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरयुक्त मॉडेल्सची जोड दिलेली आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

नोकिया ७.२ या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. हा स्क्रीन प्युअरडिस्प्ले तंत्रज्ञानाने युक्त असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षण आवरण दिलेले आहे. या डिस्प्लेमध्ये ऑल्वेज ऑन हे फिचरदेखील आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीवर चालणारा असून यात अँड्रॉइड क्यू आवृत्तीचे अपडेट लवकरच देण्यात येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here