गुगल प्ले स्टोअरवर आता रोख खरेदीचा पर्याय

0
Google-Play

गुगल प्ले स्टोअरवर आता कुणीही रोखीने इन-अ‍ॅप परचेससह अन्य बाबी खरेदी करू शकणार आहे.

गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप्स, गेम्स आदी खरेदी करण्याची सुविधा दिलेली आहे. बहुतांश अ‍ॅप्स हे मोफत असले तरी यात इन-अ‍ॅप परचेस करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात, यासाठी क्रेडीट अथवा डेबीट कार्डची आवश्यकता असते. तथापि, भारतासारख्या देशांमध्ये बर्‍याच युजर्सकडे कार्ड पेमेंट करण्याची सुविधा नाहीय. यासोबत काही युजर्स गोपनीयतेच्या कारणामुळे कार्डवरून गुगल प्ले स्टोअरवर खरेदी करण्यासाठी मागे-पुढे पाहतात. या पार्श्‍वभूमिवर, गुगलने आता युजर्ससाठी रोखीने खरेदी करण्याची सुविधा दिलेली आहे. एखाद्या मोबाईल रिचार्जप्रमाणे आता शॉपीजमधून गुगल प्ले स्टोअरचे रिचार्ज करता येणार आहे. यानंतर कुणीही आपली प्रलंबीत असणारी खरेदी अथवा हवे ते अ‍ॅप खरेदी करू शकतो. ही सुविधा विकसनशील देशांमधील युजर्सला डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आली आहे. भारतीय युजर्ससाठी हे फिचर लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. अर्थात, भारतीय युजर्स आता युपीआयवर आधारित पेमेंटचा वापर प्ले स्टोअरवर करू शकणार आहेत.

दरम्यान, गुगल प्ले स्टोअरवरील रँकींगच्या प्रणालीतही बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत एखादे अ‍ॅप हे स्टोअरवर दाखल झाल्यापासूनची सरासरी रँकीग दाखविण्यात येत होती. तथापि, यापुढे कुणीही युजर संबंधीत अ‍ॅपची वर्तमानातील रँकींग पाहू शकतो. बर्‍याचशा अ‍ॅप्सला अविकसित अवस्थेत चांगली रँकींग मिळत नाही. मात्र याच्या पुढील आवृत्त्यांना तुलनेत चांगली पसंती मिळत असते. तथापि, आजवरच्या सरासरी प्रणालीमुळे कोणत्याही अ‍ॅपबाबत खरी माहिती युजर्सला मिळत नसल्याची तक्रार बहुतांश डेव्हलपर्स करत होते. यामुळे आजवरची प्रणाली बदलण्यात येणार असल्याची माहिती गुगलतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here