गुगल असिस्टंटमध्ये आता कोणतेही वेब पेज वाचून दाखविण्याचे फिचर कार्यान्वित करण्यात आले असून यात विशेष म्हणजे मराठीचाही समावेश आहे.
गुगलने सीईएस २०२० मध्ये गुगल असिस्टंटमधील एका नाविन्यपूर्ण फिचरबाबत माहिती दिली होती. याच्या अंतर्गत गुगल असिस्टंट हा कोणत्याही वेबपेजवरील मजकूर वाचू शकणार होता. आता हेच फिचर जगभरातील युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. फक्त इंग्रजीच नव्हे तर जगातील तब्बल ४२ भाषांमधील वेब पेजेस आता गुगल असिस्टंट वाचून दाखवणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात मराठी आणि हिंदीसह अन्य काही भारतीय भाषांचा समावेश आहे. या फिचरचा वापर करण्यासाठी युजरला आपल्या स्मार्टफोनवर क्रोम ब्राऊजरमध्ये कोणतीही वेबसाईट उघडून हे गुगल रीड धीस पेज अशी कमांड द्यावी लागेल. हे फिचर गुगल न्यूजसाठीही कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
अलीकडच्या काळात गुगल असिस्टंटमध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने गत महिन्यात इंटरप्रीटर मोड प्रदान करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत अनुवादाची सुविधा अतिशय सुलभ पध्दतीत वापरता येणार आहे. याच्या पाठोपाठ वेब पेज वाचण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.