आता गुगल असिस्टंट वाचणार व्हाटसअ‍ॅपवरील मॅसेज !

0

गुगल असिस्टंटचा सपोर्ट आता काही त्रयस्थ (थर्ड पार्टी) अ‍ॅप्सला प्रदान करण्यात आलाअसून यामुळे व्हाटसअ‍ॅपसह अन्य मॅसेंजर्सवरील मॅसेज आपोआप वाचले जाण्याची सुविधा मिळणार आहे.

गुगल असिस्टंट हा व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीवर आधारित डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट असून याला जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. आजवर याला गुगलशी संबंधीत सेवांमध्येच वापरले जात होते. तथापि, आता याचे ताजे अपडेट सादर करण्यात आले असून याला काही त्रयस्थ म्हणजेच थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यात व्हाटसअ‍ॅप, स्लॅक आणि टेलीग्रामचा समावेश आहे. यातील सर्वात लोकप्रिय अर्थातच व्हाटसअ‍ॅप असून गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळाल्यामुळे या मॅसेंजर्सच्या युजर्सची खूप सोय होणार आहे.

आजवर एसएमएस तसेच गुगलची मालकी असणार्‍या अँड्रॉइड मॅसेज आणि गुगल हँगाऊटवरील संभाषण गुगल असिस्टंटच्या मदतीने ऐकण्याची सुविधा देण्यात आली होती. नेमक्या याच प्रकारे आता व्हाटसअ‍ॅपसह अन्य अ‍ॅप्सवरील मॅसेज वाचता येणार आहेत. यासाठी युजरला हे गुगल अथवा ओके गुगल म्हणून रीड मॅसेज ही व्हाईस कमांड (ध्वनी आज्ञावली) द्यावी लागेल. यानंतर गुगल असिस्टंट हा स्वयंचलीत पध्दतीत एकामागून एक मॅसेज वाचण्यास प्रारंभ करेल. संबंधीत मॅसेज हा कुणी पाठवलाय याची माहितीसुध्दा हा असिस्टंट देईल. तसेच संबंधीत मॅसेजला उत्तर द्यायचे आहे का ? अशी विचारणा करून याला उत्तरदेखील देण्याची सुविधा आता युजर्सला मिळणार आहे. गुगलने ही सुविधा सादर करण्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी जगातील अनेक युजर्ससाठी हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहे. याला क्रमाक्रमाने जगभरातील युजर्सला अपडेटच्या माध्यमातून प्रदान करण्यात येईल असे मानले जात आहे. याबाबत अँड्रॉइड पोलीस या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here