वेबवरून गुगल ड्युओ अ‍ॅप वापरून करता येणार ग्रुप कॉल

0
ड्युओ, google duo

गुगलच्या ड्युओ या व्हिडीओ कॉलींग अ‍ॅपने आता आपल्या वेबच्या युजर्ससाठी ३२ जणांच्या ग्रुप कॉलींगच्या सुविधेसह अन्य काही फिचर्स प्रदान केले आहेत.

सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जगातील बहुतेक देशांमधील लोक आपापल्या घरात बसून आहेत. तर बहुतांश कंपन्या आणि आस्थापनांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. यामुळे ग्रुप व्हिडीओ कॉलींगला वाढीव मागणी आहे. यात एका वेळी तब्बल १०० जणांसोबत ग्रुप कॉन्फरन्सींगची सुविधा देणारे झूम अ‍ॅप तुफान लोकप्रिय झालेले आहे. यामुळे आता इतर कंपन्यादेखील याकडे वळल्या आहेत. झूमला टक्कर देण्यासाठी गुगलने आपल्या मीट या चॅटींग अ‍ॅपच्या युजर्सची मर्यादा वाढविली आहे. याच्या सोबत जीमेल मधून व्हिडीओ कॉलींगची सुविधा देण्यात आलेली आहे. दरम्यान, गुगलच्या ड्युओ या व्हिडीओ कॉलींग अ‍ॅपच्या युजर्सची मर्यादा मार्च महिन्यातच ८ वरून १२ इतकी करण्यात आली होती. आतापर्यंत अ‍ॅपवरच असणारी ही सुविधा आता वेबच्या युजर्ससाठी सादर करण्यात येत असल्याची माहिती गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

या ब्लॉग पोस्टनुसार आता वेबचे युजर्स ड्युओमध्ये एकाच वेळी ३२ जणांसोबत व्हिडीओ कॉल करू शकतील. अर्थात, व्हिडीओ कॉन्फरन्सींगसाठी हे टुल उपयोगी पडणार आहे. हे कॉल एंड-टू-एंड एकक्रिप्शनयुक्त असल्याने याच्या मदतीने करण्यात आलेले कॉल हे सुरक्षित असतील असे कंपनीने नमूद केले आहे. दरम्यान, यासोबत ड्युओमध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत फॅमिली मोड दिलेला आहे. याचा उपयोग करून कुणीही कॉल करतांना यावर अतिशय आकर्षक अशा डुडल्स आणि फिल्टर्सचा वापर करू शकणार आहे. या माध्यमातून ड्युओ वरील कॉलींग हे अतिशय मनोरंजक होणार असल्याचे गुगलने नमूद केले आहे. तर क्रोममधून ड्युओ वापरणार्‍यांना ग्रुप कॉलींग करण्याआधी याचा प्रिव्ह्यू पाहण्याची सुविधा देखील प्रदान करण्यात आलेली आहे. आता ड्युओचे युजर्स व्हिडीओ चॅटींगसाठी कुणालाही अगदी सहजपणे इनव्हाईट करू शकतात. या सर्व फिचर्सच्या माध्यमातून ड्युओ हे झूमला टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here