आता इलेक्ट्रीकच्या प्लगमधून वापरता येणार अलेक्झा !

0

अमेझॉनने इको फ्लेक्स हा प्लग-इन स्मार्ट स्पीकर भारतात लाँच केला असून यामुळे आता युजर्स इलेक्ट्रीक प्लगमधून अलेक्झाचा वापर करू शकणार आहेत.

अमेझॉनने अलीकडेच आपल्या स्मार्ट स्पीकरची नवीन मालिका जाहीर केली होती. यातील इको प्लग हे मॉडेल आज भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य २,९९९ रूपये असून याची अमेझॉन इंडियावरून विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या निवडक ग्राहकांना विप्रोचा ९ वॅट क्षमतेचा २,०९० रूपये मूल्य असणारा स्मार्ट एलईडी लँप सोबत मोफत दिला जाणार आहे. वर नमूद केल्यानुसार हा प्लग-इन या प्रकारातील स्मार्ट स्पीकर आहे. यामुळे हे मॉडेल थेट इलेक्ट्रीक बोर्डवर असणार्‍या प्लगमध्ये लावता येणार आहे. यामुळे यासाठी वेगळ्या चार्जरची आवश्यकता पडणार नाही. यात युएसबी पोर्ट दिले असून यासोबत युएसबी टाईप-सी केबलच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणे चार्ज करण्याची सुविधा युजर्सला मिळणार आहे.

अमेझॉनच्या अन्य स्मार्ट स्पीकरप्रमाणे यातदेखील व्हाईस कमांडच्या मदतीने विविध फंक्शन्स पार पाडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यात अतिशय संवेदनशील मायक्रोफोन दिलेले असून याच्या मदतीने कुणीही युजर अलेक्झा या अमेझॉनच्या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला हवी ती आज्ञा देऊ शकतात. यात स्मार्टफोनशी संबंधीत विविध फंक्शन्ससह कनेक्ट असणार्‍या अन्य उपकरणांनाही कार्यान्वित करता येणार आहे. यात अलेक्झाच्या मदतीने स्मार्ट लाईटचे नियंत्रणही करता येणार आहे. यात स्पीकर इनबिल्ट स्वरूपात असला तरी अमेझॉनच्या अन्य स्मार्ट स्पीकरइतकी त्याची क्वॉलिटी नाही. अर्थात, याला ब्लु-टुथ अथवा केबलच्या मदतीने अन्य स्पीकरशी संलग्न करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here