आता अंगठी व गॉगलमध्येही वापरता येणार अलेक्झा !

0

अमेझॉनने आपल्या अलेक्झा हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला आता स्मार्ट रिंग व गॉगलमध्येही सादर करण्याची घोषणा केली आहे.

अलेक्झा हा ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडवर आधारित व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट आहे. स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले आदी उपकरणांमध्ये अलेक्झा विपुल प्रमाणात वापरले जाते. अलीकडेच अलेक्झाला हिंदीतून व्हाईस कमांड देण्याची सुविधादेखील उपलब्ध झाली आहे. तर सोशल मीडियात अलेक्झावरून अनेक धम्माल जोक्स व्हायरल होत आहेत. दरम्यान, अमेझॉनने आता अलेक्झाची व्याप्ती वाढविण्याचे संकेत दिले असून या असिस्टंटने युक्त असणारी नवीन उपकरणे लाँच केली आहेत. यात इको या मालिकेतील स्मार्ट स्पीकरसह दोन अनोखे मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यात इको लूप ही स्मार्ट रिंग (अंगठी) आणि इको फ्रेम्स या स्मार्ट गॉगलचा समावेश आहे. या दोन्ही उपकरणांमध्ये अलेक्झा हा असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे.

इको लूप हे मॉडेल लहान, मध्यम, मोठे आणि सर्वात मोठे अशा चार विविध आकारांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या अंगठीला स्मार्टफोनशी संलग्न करता येणार आहे. या स्मार्टफोनवरील विविध नोटिफिकेशन्स या अंगठीच्या माध्यमातून व्हायब्रेशन्सच्या मदतीने ऐकता येणार आहे. तर यावरून अलेक्झाला ध्वनी आज्ञावली देऊन स्मार्टफोनवरून कॉल करता येणार आहे. यासाठी अंगठीवर विशिष्ट ठिकाणी थोडा वेळ दाब द्यावा लागणार आहे. याच बटनाच्या मदतीने कॉल रिसिव्ह करणे अथवा रिजेक्ट करणे हे फंक्शन पार पाडता येईल. तर याच्या मदतीने म्युझिक ट्रॅक पॉज करता येणार आहे. या स्मार्ट रिंगचे मूल्य १७९ डॉलर्स असून याला लाँचींगच्या पहिल्या टप्प्यात १२९ डॉलर्सला उपलब्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, यासोबत अमेझॉनने इको फ्रेम्स हा गॉगलदेखील लाँच केला आहे. यात स्मार्ट ग्लासप्रमाणे अन्य फिचर्स नाहीत. यात डिस्प्ले वा ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीचे फिचर्सदेखील नाहीत. तर हा साधा चष्मा असून याला अलेक्झाचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यात एक लहानसा स्पीकर असून याच्याशी अलेक्झाच्या माध्यमातून विविध व्हाईस कमांड देता येणार आहेत. याच्याशी स्मार्टफोनला संलग्न करता येणार असून अलेक्झाच्या मदतीने विविध सुविधांचा वापर करता येणार आहे. याचे मूल्य १८० डॉलर्स आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट आता भारतात नेमके केव्हा लाँच होणार याकडे आता युजर्सचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here