आता जीमेलवरून देखील करता येणार व्हिडीओ कॉल !

0

युजरला आता आपल्या जीमेल अकाऊंटवरून व्हिडीओ कॉल करता येणार असून यासाठी गुगलने आपल्या मीट या कॉन्फरन्सींग टुलचे इंटीग्रेशन करत असल्याचे जाहीर केले आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून बहुतांश कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले आहे. यामुळे अर्थातच, व्हिडीओ कॉन्फरन्सींग टुल्सचा वापर विपुल प्रमाणात करण्यात येत आहे. सध्या जगभरात झूम अ‍ॅपची वाढलेली लोकप्रियता हेच दर्शवत आहे. झूमच्या लोकप्रियतेला टक्कर देण्यासाठी स्काईपने नोंदणी शिवाय कॉन्फरन्सींगची सुविधा प्रदान केली आहे. तर आता गुगलनेही या स्पर्धेत उडी घेण्याची तयारी केल्याचे अधोरेखीत झाले आहे.

गुगलने काही महिन्यांपूर्वीच गुगल हँगआऊटचे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. यातून गुगल मीट आणि गुगल चॅट या दोन स्वतंत्र सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सींगकडे वाढलेला कल पाहून आता गुगलने मीट या अ‍ॅपमध्ये काही नवीन फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. यात आता नवीन ले-आऊट देण्यात येणार असून एका वेळी १६ जण एकमेकांशी व्हिडीओ कॉन्फरन्स करू शकतील अशी सुविधा देण्यात येणार आहे. तर यात मंद प्रकाशातही दर्जेदार व्हिडीओ दिसणार असून ध्वनीची क्वॉलिटी देखील सुधारण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबत सर्वात लक्षणीय बाब म्हणजे गुगल मीटला आता जीमेल संलग्न करण्यात आलेला आहे. यामुळे जीमेलवरूनच युजर मीटच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करू शकणार आहे. जगभरातील युजर्सला ही सुविधा क्रमाक्रमाने देण्यात येणार आहे. हे फिचर फक्त जी-सुटच्या युजर्ससाठीच अ‍ॅक्टीव्हेट करण्यात येणार असून याचा मोफत वापर करणार्‍यांना व्हिडीओ कॉलींगचा लाभ मिळणार नाही.

गुगल मीट सध्या डेस्कटॉपसह अ‍ॅपच्या माध्यमातून वापरण्याची सुविधा दिलेली आहे. हे टुल फक्त शैक्षणिक संस्था व व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी उपलब्ध असून याचे दहा कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत दररोज दोन दशलक्ष नवीन युजर्स यासाठी साईन-अप करत असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here