अरेच्चा…आता गुंडाळून ठेवता येणारा टिव्ही !

0

एलजी कंपनीने आता चक्क गुंडाळून ठेवता येणारा टिव्ही बाजारपेठेत सादर करण्याचे जाहीर करत धमाल उडवून दिली आहे.

दिवसेंदिवस टिव्हीचा आकार हा सडपातळ होत चालला आहे. आधीच सीआरटी डिस्प्ले असणारा टिव्ही हा नंतर एलसीडी आणि एलईडीच्या जमान्यात स्लीम बनला. आणि आता तर याची जाडी कमी होण्याची जणू काही अघोषीत स्पर्धाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यातच आता एलजी कंपनीने सध्या सुरू असणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो मध्ये (सीईएस-२०१९) रोलेबल म्हणजेच गुंडाळून ठेवता येणारा टिव्ही प्रदर्शीत केला आहे. एलजी सिग्नेचर ओएलईडी टिव्ही आर (मॉडेल क्रमांक ६५आर९) या नावाने हा टिव्ही बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे.

खरं तर, वर नमूद केल्यानुसार टिव्हीची जाडी कमी झाली असली तरी या उपकरणाचा आकार वाढतच चाललेला आहे. यासाठी लागणार्‍या जागेबाबत कोणतेही नाविन्यपूर्ण संशोधन झालेले नाही. या पार्श्‍वभूमिवर, एलजीने प्रदर्शीत केलेले मॉडेल हे टिव्ही बाजारपेठेत धमाल उडवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ६५ इंच आकारमानाचा व ओएलईडी या प्रकारातील टिव्ही असणार आहे. यामध्ये फुल व्ह्यू, लाईन व्ह्यू आणि झिरो व्ह्यू असे तीन विविध मोड देण्यात आलेले आहेत. याच्या मदतीने तीन विविध प्रकारांमध्ये टिव्ही पाहता येणार आहे. फुल व्ह्यू यामध्ये नावातच दर्शविल्यानुसार पूर्णच्या पूर्ण म्हणजेच ६५ इंच आकारमानात टिव्ही पाहता येई. लाईन व्ह्यू या मोडमध्ये युजर त्याला हवा असणारा आकार कायम ठेवून टिव्ही पाहू शकतो. यात तो उर्वरित भाग गुंडाळून ठेवू शकतो. तर झीरो व्ह्यू या प्रकारात टिव्हीला पूर्णपणे गुंडाळून ठेवले जाते. अर्थात, पूर्णपणे गुंडाळण्याच्या स्थितीमध्ये स्क्रीनवर काहीही पाहता येणार नसले तरी याला ऑडिओ सिस्टीम म्हणून वापरणे शक्य आहे.

एलजीच्या या टिव्हीमधील अन्य फिचर्सदेखील सरस आहेत. यात अमेझॉनच्या अलेक्झा या व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामुळे युजर ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने त्याला हव्या त्या फंक्शन्सला कार्यान्वित करू शकतो. यात ४.२ चॅनलची व १०० वॅट क्षमतेची डॉल्बी डिजीटल ध्वनी प्रणाली प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये अ‍ॅपलचा एयर प्ले २ आणि होमकिटचा सपोर्टही दिलेला आहे. एयर प्ले २ प्रणालीच्या मदतीने युजर आयट्युनसह अन्य अ‍ॅप्सवरील व्हिडीओ आपल्या टिव्हीवर पाहू शकतो. तर होमकिटच्या मदतीने होम अ‍ॅप आणि सिरीचा वापर करता येणार आहे. या टिव्हीमध्ये एलजीचा दुसर्‍या पिढीतील अल्फा ९ हा इंटिलेजीयंट प्रोसेसर दिला असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार चलचित्रांचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हा टिव्ही प्रत्यक्षात बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here