मित्रो अ‍ॅपचे फक्त दोन महिन्यात एक कोटी डाऊनलोड

0

टिकटॉकचा देशी पर्याय म्हणून समर्थपणे पुढे आलेेले मित्रो हे भारतीय अ‍ॅप अवघ्या दोन महिन्यात एक कोटीपेक्षा जास्त डाऊनलोड करण्यात आले आहे.

सध्या सीमेवर तणाव असल्यामुळे चीन विरोधी भावना बळावली आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्होकल फॉर लोकल अशी हाक दिली असून भारतीय उपकरणे व अ‍ॅप्लीकेशन्स वापरण्याला गती मिळाली आहे. या अनुषंगाने पंतप्रधानांच्या आवाहनानंतर काही दिवसांमध्येच मे महिन्याच्या मध्यावर मित्रो हे अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. या अ‍ॅपमध्ये शॉर्ट व्हिडीओ हे अतिशय आकर्षक स्वरूपात शेअर करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. याला पहिल्यापासूनच चांगला प्रतिसाद लाभला. एकीकडे भारतीय युजर्सनी टिकटॉकला पुअर रेटींग देऊन हे अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याचा सपाटा लावतांना मित्रोचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, हे सारे होत असतांना मित्रो हे अ‍ॅप अचानकपणे गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आल्याने खळबळ उडाली. आपल्या धोरणांचे उल्लंघन करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आली होती. यानंतर काही दिवसांनी मित्रो हे अ‍ॅप पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असून याला प्रतिसाद वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमिवर गुगल प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप तब्बल १ कोटी युजर्सनी इन्स्टॉल केल्याची माहिती याची मालकी असणार्‍या कंपनीचे सहस्थापक तथा सीईओ शिवांक अग्रवाल यांनी जाहीर केली आहे. भारतात चीनविरोधी भावना प्रखर झाली असतांना डिजीटल मनोरंजनाच्या क्षेत्रात मित्रो अ‍ॅपने एक सक्षम स्वदेशी पर्याय उभा केल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे.

दरम्यान, मित्रो हे अ‍ॅप मूळचे पाकिस्तानी असून ते नंतर भारतीयांनी खरेदी केल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला होता. तथापि, मित्रो हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचा पुनरूच्चार अग्रवाल यांनी केला आहे. एक कोटी डाऊनलोड हा महत्वाचा टप्पा असला तरी तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त युजर्स असणार्‍या टिकटॉकला मात देण्यासाठी मित्रो अ‍ॅपला आपल्या युजर्सला खिळवून ठेवण्यासाठी नवनवीन फिचर्स द्यावे लागणार आहेत. यात ते कितपत यशस्वी होणार हे लवकरच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here