वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो स्मार्टफोन्स लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो हे उच्च श्रेणीतील स्मार्टफोन सादर करण्यात आले असून यांना ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

गत अनेक दिवसांपासून वनप्लस ७ आणि ७ प्रो या मॉडेल्सबाबत कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर हे दोन्ही मॉडेल्स ग्लोबल लाँच कार्यक्रमात सादर करण्यात आले असून ते लागलीच भारतातही मिळणार आहेत. वनप्लस ७ हे तीन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. यातील ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तर ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ३२,९९९ तर १० जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ३७,९९९ रूपये आहे. तर वनप्लस ७ या मॉडेलची ६ जीबी रॅम+१२८ जीबी रॅमची आवृत्ती ४८,९९९ रूपयात मिळणार आहे. ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेजचे मूल्य ५२,९९९ रूपये आहे. तर १२ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ५९,९९९ रूपये आहे.

वनप्लस ७ प्रो फिचर्स

वनप्लस ७ प्रो या मॉडेलमध्ये ६.६७ इंच आकारमानाचा, क्युएचडी (३२२० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा, १९:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा व फ्ल्युईड अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८५५ हा प्रोसेसर दिला आहे. वर याचे रॅम व स्टोअरेजचे व्हेरियंट दिलेले आहेत. याच्या मागील बाजूस तिहेरी (ट्रिपल) कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. यात ४८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून याला ८ व १६ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा वाइड अँगलने युक्त असणारा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय ९.० या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस ९.५ या आवृत्तीवर चालणारा आहे.

वनप्लस ७ फिचर्स

यातही वनप्लस ७ प्रो या मॉडेलप्रमाणेच बहुतांश फिचर्स आहेत. मात्र यातील काही फिचर्स हे त्या मॉडेलपेक्षा थोड्या कमी दर्जाचे आहेत. यातील डिस्प्ले हा त्या मॉडेलच्या क्षमते इतकाच असला तरी त्याचा आकार थोडा कमी अर्थात ६.४१ इंच इतका आहे. यात १२ जीबी रॅमचा पर्याय दिलेला नाही. तर याच्या मागील बाजूस ट्रिपल ऐवजी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सल्सच्या प्रमुख कॅमेर्‍यासह ५ मेगापिक्सल्सचा दुसरा कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. यातही १६ मेगापिक्सल्सचाच फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. यात थोड्या कमी क्षमतेची अर्थात ३,७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here