दणदणीत फिचर्सने युक्त वनप्लस ७ टी स्मार्टफोन

0

वनप्लस कंपनीने वनप्लस ७ टी हा अतिशय सरस फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

वनप्लस कंपनी आपल्या फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्ससाठी ख्यात आहे. या अनुषंगाने कंपनीने वनप्लस ७ टी हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. आधीच लाँच केलेल्या वनप्लस ७ या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. याला ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ३७,९९९ आणि ३९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. फ्रॉस्टेड सिल्व्हर आणि ग्लेशियर ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

वनप्लस ७ टी या मॉडेलमध्ये ६.५५ इंच आकारमानाचा, फ्ल्युईड अमोलेड या प्रकारातील आणि फुल एचडी प्लस (२४०० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा व एचडीआर १०+ प्रणालीने युक्त असणारा डिस्प्ले दिलेला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्टझ असून यावर वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या डिस्प्लेसह मागील भागावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरणही देण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८५५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला १६ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड लेन्स व १२ मेगापिक्सल्सच्या टेलीफोटो लेन्सची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात वार्प चार्ज ३०टी या फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस १०.० या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here