ओप्पोने भारतीय ग्राहकांसाठी फाइंड एक्स २ आणि फाईंड एक्स २ प्रो हे स्मार्टफोन्स सादर केले असून यात उच्च श्रेणीतील अनेक फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ओप्पोच्या फाइंड एक्स २ या मालिकेबाबत उत्सुकता लागली होती. या पार्श्वभूमिवर, यातील फाईंड एक्स २ आणि फाइंड एक्स २ प्रो हे दोन मॉडेल्स ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. यातील फाईंड एक्स २ या स्मार्टफोनचे मूल्य ६४,९९० रूपये असून दुसर्या मॉडेलचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. हा स्मार्टफोन ब्लॅक सिरॅमिक आणि ओशन ग्लास या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेला आहे.
ओप्पो फाईंड एक्स २ प्रो या मॉडेलमध्ये ६.७ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजे ३१६८ बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा व अल्ट्रा व्हिजन या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२० हर्टझ रिफ्रेश रेट असणारा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ६ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८६५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १२ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी इतके असून ते वाढविण्याची सुविधा मात्र दिलेली नाही. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ४८ मेगापिक्सल्सचाच अल्ट्रा वाईड अँगलयुक्त लेन्स आणि १३ मेगापिक्सल्सच्या टेलीफोटो लेन्स या अन्य दोन कॅमेर्यांची जोड दिलेली आहे. या कॅमेर्यांमध्ये २० एक्स इतका ऑप्टीकल झूम तर तब्बल ६० एक्स इतका डिजीटल झूम दिलेला आहे. यामुळे याच्या मदतीने दुरवरील छायाचित्रे व व्हिडीओ घेता येणार आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइड १० या आवृत्तीवर आधारित कलरओएस ७.१ या प्रणालीवर चालणारे आहे. तर फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यात ४१६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आयपी ६८ या मानांकनानुसार तयार करण्यात आल्याने तो वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
दरम्यान, फाईंड एक्स २ या मॉडेलमध्ये डिस्प्ले, प्रोसेसर, रॅम व स्टोअरेज आणि बॅटरी आदींसारखे फिचर्स हे एक्स २ प्रो या मॉडेलनुसारच आहेत. तथापि, यातील कॅमेरे हे प्रो मॉडेलच्या तुलनेत थोडे कमी क्षमतेचे आहेत. यातही ट्रिपल कॅमेरा असून यातला प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला वाईड अँगलयुक्त १२ मेगापिक्सल्स तर टेलीफोटो लेन्स या प्रकारातील कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे. यात ५ एक्स इतका हायब्रीड ऑप्टीकल झूम तर २० एक्स इतका डिजीटल झूम दिलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यातील ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तर यातील बॅटरी ४२०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.