पबजीच्या लाईट आवृत्तीलाही उदंड प्रतिसाद

0
पबजी गेम, pubg game

पबजी मोबाईल गेमच्या लाईट आवृत्तीलादेखील भारतीय गेमर्सनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

पबजी मोबाईल या गेमने सध्या जगभरातील तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. तासन्तास हा गेम खेळणारे आपल्याला अवती-भोवती दिसून येत आहेत. याच्या मुळे अनेक ठिकाणी अपघात होत असल्यामुळे हा गेम वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. अर्थात, कुणी काहीही म्हटले तरी पबजी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे अमान्य करता येणार नाही. पबजीचा मूळ गेम हा एक जीबी पेक्षा जास्त आकारमानाचा असून याला खेळण्यासाठी जास्त प्रमाणात डाटा खर्च होत असतो. तर भारतीय बाजारपेठेतील बहुतांश स्मार्टफोन्स हे एंट्री लेव्हलचे आहेत. यामुळे पबजीचे मूळ कंपनी असणार्‍या टेनसेंटने या गेमची लाईट आवृत्ती सादर केली आहे. याला अलीकडेच भारतीय युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या लाईट आवृत्तीलाही अतिशय उदंड प्रतिसाद लाभला असून गुगल प्ले स्टोअरवरील मोफत गेम्समध्ये पबजी लाईट आघाडीवर आहे. काही दिवसांमध्येच याचे एक कोटींपेक्षा जास्त डाऊनलोड झालेले आहेत.

पबजी लाईट या आवृत्तीसाठी ४०० मेगाबाईट इतकी जागा लागत असून २ जीबी रॅम असणार्‍या स्मार्टफोनवरूनही याला सहजपणे खेळता येते. मूळ आवृत्तीपेक्षा यामध्ये तुलनेत थोडे कमी फिचर्स दिलेले आहेत. अर्थात, मूळ गेमचा थरार यात असल्यामुळे ही आवृत्तीदेखील युजर्सच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here