ओप्पोच्या मालकीचा ब्रँड असणार्या रिअलमीने नारझो १० आणि नारझो १० ए हे किफायतशीर मूल्य असणारे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत.
रिअलमीने अनेक दिवसांपासून नारझो मालिकेचे टिझर्स सादर केले होते. लॉकडाऊनमुळे याचे लाँचींग पुढे ढकलले जाण्याची शक्यता होती. मात्र देशातील बहुतांश भागांमध्ये ई-कॉमर्सच्या व्यवहारांना परवानगी मिळाल्याने नारझो १० आणि नारझो १० ए हे दोन्ही मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यातील नारझो १० हे मॉडेल ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा एकमेव व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले असून याचे मूल्य ११,९९९ रूपये आहे. तर नारझो १० हे मॉडेल ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले असून याचे मूल्य ८,४९९ रूपये आहे. हे दोन्ही मॉडेल्स फ्लिपकार्ट व रिअलमीच्या संकेतस्थळावर अनुक्रमे २२ मे आणि १८ मे पासून खरेदी करता येणार आहेत.
नारझो १० या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १६०० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा मिनी ड्रॉप या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३+ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर हेलिओ जी८० हा प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस चार कॅमेर्यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ८ मेगापिक्सल्सचा ११९ अंशाच्या अल्ट्रा वाईड अँगलने युक्त सेन्सर; २ मेगापिक्सल्सचे मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सल्सचे डेप्थ सेन्सरची जोड प्रदान करण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यातील बॅटरी ५००० मिलीअँपिअर क्षमतेची असून यात फास्ट चार्जींगची सुविधा आहे. हे मॉडेल अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणार्या रिअलमी युजर इंटरफेसवर चालणारे आहे.
तर, नारझो १० ए या मॉडेलमध्ये तुलनेत थोडे कमी दर्जाचे फिचर्स आहेत. यातही ६.५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १६०० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा मिनी ड्रॉप या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३+ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर हेलिओ जी७० हा प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस तीन कॅमेर्यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा असून याला २ मेगापिक्सल्सचे मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरची जोड प्रदान करण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यातील बॅटरी ५००० मिलीअँपिअर क्षमतेची असून यात फास्ट चार्जींगची सुविधा आहे. हे मॉडेल अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणार्या रिअलमी युजर इंटरफेसवर चालणारे आहे.