सहा कॅमेर्‍यांनी सज्ज रिअलमी एक्स ५० प्रो फाईव्ह-जी स्मार्टफोन

0

रिअलमीने तब्बल सहा कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा तसेच अनेक सरस फिचर्सचा समावेश असणारा एक्स ५० प्रो फाईव्ह-जी हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे.

ओप्पोची उपकंपनी असणार्‍या रिअलमीने अनेकविध मॉडेल्सच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेतील आपली स्थिती मजबूत केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, रिअलमी एक्स-५० प्रो फाईव्ह-जी हे मॉडेल ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात फाईव्ह-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारतात फाईव्ह-जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमिवर, भविष्याची तजवीज करूनच हे मॉडेल लाँच करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याच्या मागील बाजूस चार तर समोर दोन अशा एकूण सहा कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यात मागच्या बाजूला ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून याला १२, ८ आणि २ मेगापिक्सल्सच्या तीन अन्य कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ३२ मेगापिक्सल्सचा असून याला ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. या कॅमेर्‍यांमध्ये २० एक्स हायब्रीड झूम दिलेला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, रिअलमी एक्स-५० प्रो फाईव्ह-जी या मॉडेलमध्ये ६.४४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याचा फ्रेश रेट ९० हर्टझ असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. ६५ वॅट सुपर चार्जर सोबत येणारी यातील बॅटरी ४,२०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८६५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याला ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज; ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि १२ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये अनुक्रमे ३७,९९९; ३९,९९९ आणि ४४,९९९ रूपये अशा तीन पर्यायात तसेच रस्ट रेड व मॉस ग्रीन या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणारा असून याला फ्लिपकार्ट आणि रिअलमी.कॉम या पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here