रिअलमीने ६४ मेगापिक्सल्सच्या क्वॉड कॅमेर्यांच्या सेटअपसह अनेकविध सरस फिचर्सने सज्ज असणारा एक्स २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.
ओप्पोची उपकंपनी असणार्या रिअलमीने अलीकडच्या काळात ग्राहकांना एकापेक्षा एक अनेक उत्तमोत्तम मॉडेल्स सादर केले आहेत. यात आता रिअलमी एक्स २ या नवीन मॉडेलची भर पडली आहे. हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. याचे ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज; ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असे तीन व्हेरियंट अनुक्रमे १६,९९९; १८,९९९ आणि १९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह रिअलमीच्या संकेतस्थळावरून खरेदी करू शकतात.
रिअलमी एक्स २ या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० हा गतीमान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे तीन व्हेरियंट उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मागील बाजूस क्वॉड अर्थात चार कॅमेर्यांचा सेटअप दिलेला असून यातील प्रमुख कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. याला ८ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड, २ मेगापिक्सल्सचा सुपर मॅक्रो तर २ मेगापिक्सल्सच्याच डेप्थ सेन्सर कॅमेर्यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. व्हीओओसी ४.० फास्ट चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड ९ प्रणालीवर आधारित कलरओएस ६.१ या प्रणालीवर चालणारा आहे.