रेनो कंपनीने सात आसनक्षमता असणारे ट्रायबर हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.
गत अनेक दिवसाांसून रेनो ट्रायबरबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले होते. अखेर कंपनीने या मॉडेलचे अनावरण केले आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ही कार कॉम्पॅक्ट एसयुव्ही या प्रकारातील असली तरी कंपनीने याला प्रिमीयम हॅचबॅक म्हणून बाजारात सादर केले आहे. याचा आकार हॅचबॅक सारखाच असला तरी यात आसनांची तिसरी रांग ( रो ) प्रदान करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र एसी व्हेंट, आर्मरेस्ट व चार्जींग सॉकेटदेखील दिलेले आहेत. अंतर्भागाचा विचार केला असता या मॉडेलमध्ये ड्युअल टोन या रंगसंगतीतील इंटेरिअर दिलेले आहे. याच्या क्लस्टरमध्ये ३.५ इंच आकारमानाचा डिजीटल डिस्प्ले आहे. तर यात आठ इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले असणारी इन्फोटेनमेंट सिस्टीम प्रदान करण्यात आलेली असून यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले या प्रणालींचा सपोर्ट आहे. याच्या मदतीने नेव्हिगेशनसह मनोरंजनाची सुविधा युजरला मिळणार आहे.
सुरक्षेसाठी रेनो ट्रायबरमध्ये ड्युअल फ्रंट एयरबॅग्ज दिलेल्या आहेत. यात एबीएस प्रणाली आहे. यात स्पीड अलर्टची सुविधादेखील दिलेली आहे. तर याच्या उच्च व्हेरियंटमध्ये रिव्हर्स पार्कींग सेन्सर व कॅमेरादेखील दिलेला आहे. या मॉडेलमध्ये १.० लीटर क्षमतेचे बीआर १० हे पेट्रोल इंजिन असून याला ५ स्पीड मॅन्युअल गिअर्स संलग्न करण्यात आले आहेत. याच्या उच्च व्हेरियंटमध्ये ५ स्पीड अॅटोमॅटीक गिअर्सची सुविधादेखील दिलेली आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत रेनो कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. तथापि, याच्या व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य ७ ते ९ लाखांच्या दरम्यान असेल अशी माहिती समोर आली आहे.