सॅमसंगची पुन्हा भारतीय बाजारपेठेवर पकड

0
Samsung_Logo

सॅमसंगने पुन्हा एकदा उच्च श्रेणीच्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर कब्जा करत पहिला क्रमांक पटकावल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात विकले जातात. यानंतर मिड रेंज आणि नंतर प्रिमीयम अर्थात उच्च श्रेणीचा क्रमांक लागतो. तथापि, एकंदरीत उलाढालीचा विचार केला असता ३० हजारांच्या वरील मूल्य असणारे मॉडेल्स हे कोणत्याही कंपनीसाठी महत्वाचे मानले जातात. सॅमसंगने या क्षेत्रात अनेक वर्षे अग्रक्रम कायम राखला होता. तथापि, मध्यंतरी वनप्लस या चीनी कंपनीने जोरदार मुसंडी मारून सॅमसंगला दुसर्‍या क्रमांकावर फेकले होते. या कंपनीच्या वनप्लस ६ आणि ६ टी या मॉडेल्सला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे ही बाब शक्य झाली होती. सुमारे वर्षभरापर्यंत वनप्लस पहिल्या क्रमांकावर विराजमान होती. तथापि, या वर्षातील पहिल्या तिमाहीतल्या (जानेवारी ते मार्च २०१९) आकडेवारवरून काऊंटरपॉइंट या संस्थेने जाहीर केलेल्या रिपोर्टमधून सॅमसंगने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

काऊंटरपॉइंटच्या अहवालानुसार सॅमसंगने हँडसेटच्या विक्रीत ७६.५ तर रकमेत ७७ टक्के इतकी प्रिमीयम स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज केली आहे. यानंतर वनप्लस आणि अ‍ॅपल कंपनीचे क्रमांक आहेत. या तिन्ही कंपन्यांनी एकूण ९० टक्के वाटा मिळवला असून १० टक्क्यांमध्ये हुवावेसह अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सॅमसंगच्या या यशात कंपनीच्या गॅलेक्सी एस १० या मॉडेलला मिळालेले जोरदार यश कारणीभूत असल्याची बाब स्पष्ट आहे. भारतात प्रिमीयम या वर्गवारीत विकल्या जाणार्‍या प्रत्येक चार स्मार्टफोनपैकी तब्बल तीन मॉडेल हे सॅमसंगचे असल्याची बाबदेखील लक्षणीय आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा कल हा दुसर्‍या तिमाहीतही कायम राहण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here