सॅमसंगने घडी करण्याजोगा गॅलेक्सी झेड फ्लिप हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
सॅमसंगने आपली गॅलेक्सी एस२० ही मालिका सादर करतांना गॅलेक्सी झेड फ्लिप हे मॉडेलदेखील बाजारपेठेत लाँच केले आहे. याच कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले. यात एकापेक्षा एक अनेक सरस फिचर्स असले तरी याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात फोल्ड होणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. सॅमसंगने गेल्या वर्षीच गॅलेक्सी फोल्ड हा घडी करण्याजोगा स्मार्टफोन सादर केला होता. तथापि, याला अपेक्षेइतका प्रतिसाद लाभला नाही. या पार्श्वभूमिवर, गॅलेक्सी झेड फ्लिप या मॉडेलमध्ये बर्याच प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यात अतिशय पातळ तथापि, मजबूत आणि लवचीक ग्लास प्रदान करण्यात आला आहे. यापासून तयार करण्यात आलेला डिस्प्ले हा घडी करता येतो. याचाच वापर या स्मार्टफोनमध्ये करण्यात आला आहे.
गॅलेक्सी झेड फ्लिप या मॉडेलचा डिस्प्ले हा पूर्णपणे खुला असतांना ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा तसेच इन्फीनिटी फ्लेक्स या प्रकारातील आहे. तर याच्या पाठीमागे १.१ इंच आकारमानाचा डिस्प्ले दिलेला आहे. यावर नोटिफिकेशन्स आणि वेळ पाहण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची घडी घातल्यानंतर याचा आकार खूप कमी होतो. यामुळे हा स्मार्टफोन आकाराने अतिशय आटोपशीर असा आहे. अर्थात, याचमुळे हे मॉडेल अनेकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा अतिशय गतीमान असा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज २५ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील बॅटरी ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणारा आहे.
गॅलेक्सी झेड फ्लिप या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेर्यांचा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा वाईड अँगलयुक्त तर दुसरा तितक्याच क्षमतेचा आणि अल्ट्रा वाईड अँगलयुक्त आहे. याच्या मदतीने अल्ट्रा हाय डेफिनेशन क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १० मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत याचे मूल्य १३८० डॉलर्स असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. तर भारतात हे मॉडेल लवकरच सादर होण्याची शक्यता आहे.