सॅमसंगच्या गॅलेक्सी एस २० मालिकेचे अनावरण : जाणून घ्या सर्व फिचर्सची माहिती

0

सॅमसंगने प्रचंड उत्सुकता लागून असणार्‍या आपल्या एस२० या मालिकेत तीन स्मार्टफोन लाँच केले असून यात ८-के व्हिडीओ चित्रीकरणासह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या प्रारंभ सॅमसंग कंपनीने प्रॉडक्ट लाँचींगची माहिती जाहिर केली तेव्हाच यात नेमके कोणते मॉडेल्स सादर करण्यात येतील याबाबत उत्सुकता लागली होती. यात गॅलेक्सी एस२० या मालिकेसह गॅलेक्सी झेड फ्लिप हा फोल्डींग फोन लाँच करण्यात येणार असल्याची माहिती आधीच लीक झाली होती. या पार्श्‍वभूमिवर, सॅमसंगने एका शानदार कार्यक्रमात गॅलेक्सी एस२०, गॅलेक्सी एस२०प्लस आणि एस२० अल्ट्रा या तीन मॉडेलसह गॅलेक्जी झेड फ्लिप या मॉडेल्सचे अनावरण केले.

काही समान फिचर्स

सॅमसंगने गत वर्षी सादर केलेल्या एस१० या मालिकेची नवीन आवृत्ती म्हणून एस२० ही मालिका बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. या तिन्ही मॉडेल्समध्ये जवळपास सारखे मॉडेल्स असले तरी डिस्प्ले साईज, रॅम व स्टोअरेज आणि कॅमेर्‍यांची क्षमता ही भिन्न आहे. या मॉडेल्सचे वैशिष्ट्य म्हणजे यात १२० हर्टझ रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यामुळे याच्या स्क्रीनवर अतिशय जीवंत वाटणार्‍या चित्रांची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे तिन्ही मॉडेल्स क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८६५ व एक्झीनॉस ९९० या प्रोसेसरने युक्त असणार आहेत. हे तिन्ही मॉडेल्स डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ असल्याने कोणत्याही वातावरणात अगदी सहजपणे वापरता येणार आहेत. तर तिन्ही मॉडेल्स अँड्रॉइड १० या आवृत्तीवर चालणारे आहेत. या तिन्ही मॉडेल्समध्ये रिव्हर्स चार्जींगची सुविधा आहे. यामुळे यातील बॅटरी ही पॉवर बँक म्हणूनदेखील वापरता येणार आहे.

गॅलेक्सी एस२०

यातील एस२० या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि क्वॉड-एचडी प्लस क्षमतेचा म्हणजेच ३२०० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील इन्फीनिटी ओ हा डिस्प्ले दिलेला आहे. यात एचडीआर १० सपोर्ट दिलेला आहे. या डिस्प्लेवर असणारा फ्रंट कॅमेरा हा एस१० या मालिकेप्रमाणेच १० मेगापिक्सल्स क्षमतेचाच आहे. तथापि, याचा डिस्प्लेवरील पंच होल हा आधीपेक्षा बारीक असा आहे. याच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील प्रमुख कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा आहे. तर याला ६४ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याची जोड असून याच्या मदतीने तब्बल ८-के क्षमतेचे चित्रीकरण करता येणार आहे. या दोघांना अल्ट्रा वाईड लेन्सने युक्त असणार्‍या १२ मेगापिक्सल्सच्या तिसर्‍या कॅमेर्‍याची जोड देण्यात आली आहे. यात अल्ट्रोसोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील दिलेले आहे. या मॉडेल्समध्ये २५ वॅट फास्ट चार्जरसह ४००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली आहे. यात फोर-जी सोबत फाईव्ह-जी नेटवर्क सपोर्टदेखील प्रदान करण्यात आलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते एक टिबी इतके वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हा स्मार्टफोन कॉस्मीक ग्रे, क्लाऊड ब्ल्यू आणि कॉस्मीक ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

गॅलेक्सी एस२० प्लस

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस२० प्लस या मॉडेलमध्ये ६.७ इंच आकारमानाचा व क्वॉड-एचडी प्लस क्षमतेचा म्हणजेच ३२०० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील इन्फीनिटी ओ हा डिस्प्ले दिलेला आहे. यात एचडीआर १० सपोर्ट दिलेला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा हा ६४ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स असेल. याला १२ मेगापिक्सल्सचा वाईड अँगलयुक्त; १२ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगलयुक्त आणि डेप्थ सेन्सर अशा तीन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. यात ३ एक्स ऑप्टीकल हायब्रीड झूम आणि ३० एक्स डिजीटल झूम करून छायाचित्रे आणि व्हिडीओ घेता येणार आहेत. यातदेखील ८-के क्षमतेचा व्हिडीओ घेता येणार आहे. तर यातदेखील १० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. या मॉडेलची रॅम ८ जीबी व स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने एक टिबी इतके वाढविता येणार आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. हे मॉडेल कॉस्मीक ग्रे, क्लाऊड ब्ल्यू आणि कॉस्मीक ब्लॅक या तीन आकर्षक रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

गॅलेक्सी एस२० अल्ट्रा

सॅमसंगचा एस२० अल्ट्रा हा सर्वात उच्च फिचर्सने युक्त असणारा स्मार्टफोन असणार आहे. याच्या मागील बाजूसदेखील क्वॉड कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्सयुक्त आहे. तर याला १०८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगलने युक्त; १२ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगलयुक्त आणि एक डेप्थ सेन्सर अशा तीन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. याच्या मदतीनेही ८-के क्षमतेचे चित्रीकरण करता येणार आहे. यात १० एक्स ऑप्टीकल हायब्रीड झूम आणि १०० एक्स डिजीटल झूमची सुविधा आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातील फ्रंट कॅमेरा हा तब्बल ४० मेगापिक्सल्स क्षमतेचा दिलेला आहे. यात १२ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज; १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज आणि १६ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेज असे तीन पर्याय दिलेले आहेत. या तिघांमध्ये एक टिबीपर्यंत स्टोअरेज वाढविता येणार आहे. हे मॉडेल कॉस्मीक ग्रे आणि कॉस्मीक ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये मिळणार आहे. यात ४५ वॅट क्षमतेच्या चार्जरसह ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून ती उत्तम बॅकअप देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

मूल्य आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी एस२० या स्मार्टफोनची मालिका ६ मार्चपासून जगभरातील विविध देशांमध्ये मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत यातील गॅलेक्सी एस२० या स्मार्टफोनचे व्हेरियंट ९९९ डॉलर्सपासून मिळतील. एस२० प्लस हे मॉडेल ११९९ डॉलर्स तर एस२० अल्ट्रा हे मॉडेल १३९९ डॉलर्सला मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here