सॅमसंगने चार कॅमेर्यांनी सज्ज असणारा गॅलेक्सी ए५१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी सादर केला आहे.
सॅमसंगला अलीकडेच विवोने मागे टाकून भारतीय बाजारपेठेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या पार्श्वभूमिवर, आपले स्थान टिकवण्याचे मोठे आव्हान सॅमसंगसमोर आहे. या पार्श्वभूमिवर, सॅमसंग गॅलेक्सी ए५१ हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. याला ६जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज तसेच ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. तथापि, पहिल्यांदा याच्या फक्त ६ जीबी रॅमचे व्हेरियंट ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य २३,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार याच्या मागील बाजूस चार कॅमेर्यांचा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ५ मेगापिक्सल्सचा मॅक्रो लेन्स, १२ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड लेन्स आणि अन्य ५ मेगापिक्सल्सचा एक अशा तीन कॅमेर्यांची जोड दिलेली आहे. या चारही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता सॅमसंग गॅलेक्सी ए५१ या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा एस अमोलेड या प्रकारातील इन्फीनिटी-ओ डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याच्या वरील बाजूस पंच होल या प्रकारातील फ्रंट कॅमेरा लावण्यात आलेला आहे. यात सॅमसंग कंपनीचाच एक्झीनॉस ९६११ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असणार आहेत. यात १५ वॅट फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अलाईव्ह इंटेलेजीयन्स आणि इंटिलेजीयंट किबोर्ड हे दोन विशेष फिचर्स दिलेले आहेत. हा स्मार्टफोन ब्ल्यू, व्हाईट आणि ब्लॅक प्रिझम क्रश या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे.