दिव्यांगांसाठी सॅमसंगचे दोन स्वतंत्र अ‍ॅप

0

सॅमसंगने दिव्यांगांसाठी व्हाईब आणि रिल्युमिनो हे दोन अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने मूक आणि अधू दृष्टी असणार्‍यांना मदत होणार आहे.

आपले आयुष्य सुखी करण्यात तंत्रज्ञानाचा सर्वात मोलाचा वाटा आहे. यात विविध कंपन्यांनी अंपगत्वावर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा प्रदान करत आहेत. या अनुषंगाने सॅमसंग इंडिया कंपनीने व्हाईब आणि इल्युमिनो या नावाने खास दिव्यांगांसाठी दोन स्वतंत्र सेवा सुरू केल्या आहेत. यातील व्हाईब ही प्रणाली अंध आणि मूक असणार्‍यांना वरदान ठरणार आहे. एकाच वेळेस मूक आणि अंधत्व असल्यास अन्य व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी अडचण येते. नेमकी हीच बाब लक्षात घेत व्हाईब हे अ‍ॅप विकसीत करण्यात आलेले आहे. यात एका बाजूने कुणीही मूक/अंध व्यक्ती मोर्स कोडच्या मदतीने संदेश पाठवू शकते. हाच संदेश समोरच्या व्यक्तीला शब्द व ध्वनींमध्ये मिळू शकतो. अर्थात या अ‍ॅपच्या एका बाजूला दिव्यांग व्यक्ती व्हाईब अ‍ॅपवरून मोर्स कोडच्या मदतीने संदेश पाठविणार असून त्याच्या आप्तांना हा मॅसेज शब्द व ध्वनीच्या स्वरूपात ऐकता वा वाचता येणार आहे. तर समोरील व्यक्तींनी शब्द वा ध्वनीच्या स्वरूपात मॅसेज पाठविल्यास तो दिव्यांगाला मोर्स कोडमधून समजणार आहे. व्हाईब हे अ‍ॅप असून याला कुणीही वापरू शकते.

दरम्यान, सॅमसंग इंडियाने रिल्युमिनो हे दुसरे अ‍ॅपदेखील सादर केलेले आहे. याच्या मदतीने दृष्टी अधू असणार्‍यांना स्मार्टफोनवरील फाँट अथवा प्रतिमा अधिक स्पष्ट व ठळकपणे दिसण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी स्मार्टफोनला व्हिआर हेडसेट जोडण्याची आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे. रिल्युमिनोसाठी सॅमसंगने अधूंसाठी काम करणार्‍या नॅब या संस्थेशी सहकार्याचा करार केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here