तंत्रज्ञांच्या एका चमूने आता चक्क लवचीक बॅटरी तयार केली असून याचा उपयोग वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांमध्ये करता येणार आहे.
बॅटरी हा आधुनीक गॅजेटचा आत्मा होय. प्रदीर्घ काळापर्यंत चालणारी आणि अल्पावधीच चार्ज होणारी बॅटरी ही उत्तम मानली जाते. यामुळे विविध कंपन्यांनी आजवर या दोन मानकांवर आधारित बॅटर्यांना प्राधान्य दिल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. याच दोन मानकांमध्ये सुधारणा करणार्या बॅटर्यांना विकसित केले जात असल्याचेही आपण पाहिले आहे. या पार्श्वभूमिवर, स्टॅनफर्ड विद्यापीठातील तंत्रज्ञांच्या एका पथकाने लवचीक बॅटरीची निर्मिती केली आहे. अर्थात, ही बॅटरी लांबवली जाऊ शकते. तसेच याला वाकवणेही शक्य आहे.
या नवीन बॅटरीसाठी विशिष्ट प्रकारचे पॉलिमर तयार करण्यात आले आहे. खरं तर, लिथीयम आयन या प्रकारच्या बॅटरीमध्ये पॉलिमर हे इलेक्ट्रोलाईट म्हणून काम करते. तथापि, आजवर वापरण्यात येणारे पॉलिमर हे ताठर या प्रकारातील होते. तर नव्याने तयार करण्यात आलेले पॉलिमर हे अतिशय लवचीक असून याला ताणून अथवा वाकवून वापरता येणार आहे. यात स्थिर प्रकारे उर्जेचा वापर करता येत असल्याचे विविध प्रयोगांमधून दिसून आले आहे. या नवीन पॉलिमरच्या मदतीने वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यास योग्य उपकरणांसाठी लवचीक आकाराच्या बॅटरीज तयार करणे शक्य होणार आहे.