अँड्रॉइड वॉकमनचे आगमन; टचस्क्रीन मॉडेल दाखल

0

कधी काळी प्रचंड लोकप्रिय झालेल्या वॉकमनचे अँड्रॉइड आवृत्तीच्या स्वरूपात पुनरागमन झाले असून आता टचस्क्रीन डिस्प्ले असणारा नवीन वॉकमन लाँच करण्यात आला आहे.

१९७९ मध्ये सोनी कंपनीच्या वॉकमनचे आगमन झाले. यानंतर जगभरात हे मॉडेल तुफान लोकप्रिय झाले. या माध्यमातून पोर्टेबल म्युझिक क्रांतीस प्रारंभ झाला. हे पोर्टेबल कॅसेट प्लेअर आयकॉनीक या श्रेणीत गणले गेले. साधारणत: दोन दशकांपर्यंत वॉकमनची लोकप्रियता अबाधित होती. तथापि, विसाव्या शतकाच्या शेवटी कॅसेटची सद्दी संपून सीडी अर्थात काँपॅक्ट डिस्क अस्तित्वात आली. तर काही वर्षांमध्येच आयपॉड सारखे पोर्टेबल डिजीटल प्लेअर बाजारपेठेत आले. यानंतर काही वर्षांमध्ये स्मार्टफोन वापरात आल्याने हे म्युझिक प्लेअरदेखील कालबाह्य झाले. या सर्व घडामोडींमध्ये वॉकमन कुठे अदृश्य झाला हे समजलेदेखील नाही. मध्यंतरी अनेकदा वॉकमन पुन्हा नव्या स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून वॉकमन हा नव्याने लाँच करण्यात आला आहे.

नवीन वॉकमन एनडब्ल्यू-ए१०५ हा अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा असून यात ३.६ इंच आकारमानाचा टचस्क्रीनयुक्त डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात हाय रेझोल्युशन या प्रतीच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यात वाय-फायचा सपोर्ट असल्यामुळे यावर विविध स्ट्रीमिंग सेवांचा वापरदेखील करता येणार आहे. याचे इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यात अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २६ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या वॉकमनचे नुकतेच अनावरण करण्यात आले असून भारतीय चलनात याचे मूल्य सुमारे २३ हजारांच्या आसपास असेल अशी माहिती देण्यात आली आहे. पहिल्यांदा हे उपकरण जपानमध्ये लाँच करण्यात आले असून ते लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here