सोनीचा गुगल असिस्टंटयुक्त स्मार्ट टिव्ही

0

सोनी कंपनीने स्मार्ट टिव्हीची नवीन मालिका सादर केली असून यात गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे.

स्मार्टफोनसह बहुतांश स्मार्ट उपकरणांमध्ये गुगल तसेच अन्य कंपन्यांचे व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट वापरले जात आहेत. यात अगदी सुलभ पध्दतीत व्हाईस कमांडचा वापर केला जात असल्यामुळे युजर्ससाठी हे फिचर अतिशय महत्वपूर्ण ठरत आहेत. अलीकडे काही टिव्हींमध्येही ही सुविधा दिली जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, सोनी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी सादर केलेल्या मास्टर ए९जी फोर-के या नवीन मालिकेत गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा वापर करून या टिव्हीतील विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो.

सोनी कंपनीने मास्टर या मालिकेत अनुक्रमे ५५ आणि ६५ इंच आकारमानाचे टिव्ही लाँच केले असून यांना अनुक्रमे २,६९,९०० आणि ३,६९,९०० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. हे दोन्ही मॉडेल्स कंपनीच्या देशभरातील शोरूम्ससह बहुतेक ऑनलाईन शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहेत. या टिव्हींमध्ये ३८४० बाय २१६० म्हणजेच फोर-के क्षमतेचा तसेच १६:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यात एक्स वन अल्टीमेट हा प्रोसेसर दिला असून याच्या मदतीने एसडी आणि एचडी क्षमतेचे चलचित्रदेखील फोर-के या क्षमतेमध्ये पाहण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस या प्रणाली दिलेल्या आहेत. यात २.२ चॅनलची अद्ययावत ध्वनी प्रणाली असून यात दोन अतिशय शक्तीशाली वुफर्सचा समावेश आहे. यातील टिव्ही सेंटर स्पीकर मोडच्या मदतीने याला होम थिएटर म्हणून वापर करण्याची सुविधा दिलेली आहे. सोनीचे हे दोन्ही टिव्ही अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे आहेत. यात गुगल प्ले स्टोअर दिलेले असून युट्युब, नेटफ्लिक्ससारखे अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here