व्हाटसअ‍ॅप व इन्स्टाग्रामचे नाव बदलणार

0

व्हाटसअ‍ॅप व इन्स्टाग्रामचे लवकरच नाव बदलणार असून यांच्यावरील फेसबुकची मालकी ही सर्वांना स्पष्ट होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

नावात काय आहे असे म्हटले जाते. तथापि, आता व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामसाठी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर आणि इन्स्टाग्रामची मालकी फेसबुककडे असल्याची माहिती सर्वांना आहे. तथापि, आता हीच माहिती अधिकृतपणे सर्वांना कळावी यासाठी या दोन्ही सेवांची नावे बदलण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यावर काम सुरू झाले असून या दोन्ही सेवांना अनुक्रमे ‘व्हाटसअ‍ॅप फ्रॉम फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ या नवीन नावांनी ओळखले जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बर्‍याच अजस्त्र कंपन्या आपल्याला स्पर्धक ठरू शकतील अशा लहान कंपन्यांना विकत घेऊन एकाच फटक्यात डोकेदुखी खतम करत असतात. अशा प्रकारचे बहुतांश व्यवहार हे अँटीट्रस्टच्या अंतर्गत येत असतात. याला आळा घालण्यासाठी कायदे आहेत. या अनुषंगाने फेसबुकनेही व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामचे अधिग्रहण करतांना कायद्याचे उल्लंघन केले का ? अशी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकने व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामचा वापर करणार्‍यांना या दोन्ही सेवांची मालकी ही फेसबुककडे असल्याची माहिती अगदी ठळकपणे मिळणार आहे.

या दोन्ही सेवांची अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही अ‍ॅप्सची नावे बदलण्यात येणार आहेत. अर्थात, गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर नावांचे बदल लवकरच होणार असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे बदल दृश्यमान होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here