लवकरच येणार नेटफ्लिक्सचे किफायतशीर प्लॅन्स

0

नेटफ्लिक्स या व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेने अत्यंत किफायतशीर मूल्य असणारे प्लॅन्स सादर करण्याचे संकेत दिले असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

भारतीय युजर्समध्ये व्हिडीओ ऑन डिमांड सेवा हळूहळू लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. खरं तर सायबर विश्‍वातील बहुतांश कंटेंट हे मोफत असले तरी आता प्रिमीयम कंटेंटसाठी पैसे मोजण्याची तयारी असणारा वर्ग आकारास आला आहे. या क्षेत्रात बर्‍याच कंपन्या कार्यरत असून यात नेटफ्लिक्स आघाडीवर आहे. यात विपुल प्रमाणात देशी-विदेशी कंटेंट असून यातील काही विख्यात वेब सेरीजदेखील युजर्सला भावल्या आहेत. अर्थात, नेटफ्लिक्स हे अन्य सेवांच्या तुलनेत थोडे महागडे आहे. याचे बेसिक, स्टँडर्ड आणि प्रिमीयम असे तीन प्लॅन्स असून यांचे दर अनुक्रमे ५००, ६५० आणि ८०० रूपये प्रति-महिना इतके आहे. मात्र भारतीय बाजारपेठेत मूल्य हा सर्वात महत्वाचा घटक असल्याची बाब आधीच स्पष्ट झाली आहे. स्मार्टफोनसह अन्य उपकरणांचा विचार केला असता सर्वाधीक मॉडेल्स हे एंट्री लेव्हलचेच विकले जात असल्याची बाब आधीच अधोरेखीत झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, भारतीय बाजारपेठेवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी नेटफ्लिक्सने किफायतशीर दराचे प्लॅन्स सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

नेटफ्लिक्स आता अत्यंत किफायतशीर मूल्य असणारे प्लॅन्स सादर करणार आहेत. हे सर्व प्लॅन्स फक्त स्मार्टफोन्सधारकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. अर्थात फक्त स्मार्टफोन वा टॅबलेटवरूनच कंटेंट पाहणार्‍यांना याचा उपयोग होणार आहे. याला लॅपटॉप, डेस्कटॉप अथवा टिव्हीवरून पाहता येणार नाही. याच्या अंतर्गत आठवड्यासाठी ६५ रूपयांची आकारणी करण्यात येणार आहे. मात्र यात एचडी अथवा अल्ट्रा एचडी या प्रकारातील कंटेंट नसेल हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, १२५, १६५ आणि २०० रूपये आठवडा अशी आकारणी असणारे प्लॅन्सही सादर करण्यात येणार आहेत. हे वर नमूद केलेल्या बेसिक, स्टँडर्ड आणि प्रिमीयम प्लॅन्सची लघु आवृत्ती असतील. नेटफ्लिक्सने हे प्लॅन्स अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत. तथापि, लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here