अरे व्वा…आता स्मार्टफोनमध्ये येणार ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा !

0

स्मार्टफोनमध्ये येत्या काही महिन्यांमध्येच तब्बल ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा येणार असल्याचे स्पष्ट झाले असून सॅमसंगने याबाबत घोषणा केली आहे.

सॅमसंगने काही महिन्यांपूर्वीच ४८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेरा सेन्सरची घोषणा केली होती. यानंतर काही स्मार्टफोन्समध्ये हा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये बर्‍याच मॉडेल्समध्ये ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल असे मानले जात आहे. अर्थात, याच्या आधीच आता स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. कॅमेरा सेन्सरच्या निर्मितीत आघाडीवर असणार्‍या सॅमसंगने आता तब्बल ६४ मेगापिक्सल्सचे कॅमेरा सेन्सर तयार केले आहे. येत्या काही महिन्यांमध्येच याचे मास प्रॉडक्शन सुरू होणार आहे. यामुळे लवकरच स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सॅमसंगने ६४ मेगापिक्सल्सचे जीडब्ल्यू १ हे आयसोसेल या प्रकारातील सेन्सर तयार केले असून याबाबत घोषणा केली आहे. यामध्ये सॅमसंगनेच विकसित केलेल्या टेट्रासेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने लख्ख प्रकाशात ६४ मेगापिक्सल्स तर अंधुक प्रकाशात १६ मेगापिक्सल्स क्षमतांच्या प्रतिमा घेता येणार आहेत. यासाठी यात स्वतंत्र सेटींग देण्यात येणार आहे. तसेच याच्या मदतीने एचडीआर म्हणजेच हाय डायनॅमिक रेंजयुक्त दर्जेदार व्हिडीओ चित्रीकरणदेखील करता येणार असल्याचे सॅमसंगने नमूद केले आहे. यासोबत सॅमसंगने जीडब्ल्यू २ हे ४८ मेगापिक्सल्सचे सेन्सरदेखील जाहीर केले आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी नोट १० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनला बाजारपेठेत सादर करणार आहे. यात अतिशय दर्जेदार कॅमेरा असू शकतो अशी आधीपासूनच चर्चा होती. आता सॅमसंगच्या नवीन सेन्सरमुळे याला पुष्टी मिळाल्याचे मानले जात आहे. तर अन्य कंपन्याही या सेन्सरच्या मदतीने ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देऊ शकतात हेदेखील स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here