अरे व्वा…लवकरच स्मार्टफोनमध्ये येणार १०८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा !

0
सॅमसंगने जारी केलेले १०८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेरा सेन्सरचे छायाचित्र.

स्मार्टफोनमधील कॅमेर्‍यांची स्पर्धा तीव्र होत असतांनाच आता सॅमसंगने तब्बल १०८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याचे सेन्सर सादर करून धमाल उडवून दिली आहे.

कॅमेरा हा कोणत्याही स्मार्टफोनमधील अविभाज्य घटक होय. साधारणपणे मागील बाजूस मुख्य तर पुढील बाजूस सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा हा प्रत्येक स्मार्टफोनमध्ये दिलेला असतो. अलीकडच्या काळात कॅमेर्‍यांमध्ये अनेक नवनवीन सुविधा देण्यात येत असून मेगापिक्सल्सच्या बाबतीत तर जणू काही स्पर्धाच सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत मोजक्या कॅमेर्‍यांमध्ये ४८ मेगापिक्सल्सचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. याला ड्युअल वा ट्रिपल कॅमेर्‍यांची जोडदेखील दिली जात आहे. अर्थात, सध्या ४८ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असणारे स्मार्टफोन्स हे प्रचलीत होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, या वर्षीच्या मे महिन्यातच सॅमसंगने तब्बल ६४ मेगापिक्सल्स क्षमतेचे कॅमेरा सेन्सर सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सॅमसंगचे हेच आयसोसेल जीएब्ल्यू १ हे सेन्सर आता शाओमी कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाओमीच्या मालकीचा ब्रँड असणारा रिअलमी लवकरच ६४ मेगापिक्सल्स कॅमेर्‍याने युक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. यात क्वॉड म्हणजेच चार कॅमेर्‍यांचा सेटअप असणार आहे. एकीकडे ६४ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने युक्त असणार्‍या स्मार्टफोनच्या आगमनाची उत्सुकता लागली असतांनाच आता सॅमसंग कंपनीने तब्बल १०८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याचे सेन्सर सादर करून धमाका केला आहे.

या संदर्भात सॅमसंगने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अधिकृत माहिती जाहीर केली आहे. यानुसार सॅमसंगने आयसोसेल ब्राईट एचएमएक्स हे १०८ मेगापिक्सल्स क्षमतेचे कॅमेरा सेन्सर विकसित केले आहे. यासाठी शाओमी कंपनीचे सहकार्य घेण्यात आल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. हा कॅमेरा अतिशय कमी प्रकाश असतांनाही अत्यंत दर्जेदार प्रतिमा घेण्यास सक्षम असल्याचे यात नमूद केलेले आहे. तर याचे आकारमान १/१.३३ इंच आकारमानाचा असल्याने यात प्रकाश उत्तम प्रकारे शोषला जाऊन अगदी स्पष्ट आणि सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता येणार असल्याचा दावादेखील यात करण्यात आला आहे. तसेच याच कॅमेर्‍याच्या मदतीने ६-के म्हणजे ६०१६ बाय ३३८४ पिक्सल्स क्षमतेचे व ३० फ्रेम्स प्रति सेकंद इतक्या गतीने व्हिडीओ चित्रीकरणदेखील करता येणार असल्याची माहिती सॅमसंगतर्फे देण्यात आलेली आहे. या महिन्याच्या अर्थात ऑगस्ट अखेरीस या कॅमेरा सेन्सरचे उत्पादन सुरू होणार असल्यामुळे येत्या काही महिन्यातच स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल हे निश्‍चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here