व्हाटसअ‍ॅपवर येणार प्रॉडक्ट कॅटलॉग

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच प्रॉडक्ट कॅटलॉग येणार असून याच्या माध्यमातून या मॅसेंजरला ई-कॉमर्सचा आयाम देण्यात येणार आहे.

फेसबुकच्या एफ ८ या वार्षिक परिषदेस प्रारंभ झाला आहे. याच्या प्रारंभी मार्क झुकरबर्ग यांच्या कि-नोट भाषणातून फेसबुक आणि याची मालकी असणार्‍या कंपन्यांच्या भवितव्याची चुणूक दर्शविण्यात आली आहे. यातच झुकरबर्ग यांनी व्हाटसअ‍ॅपवर लवकरच प्रॉडक्ट कॅटलॉग येणार असल्याचे जाहीर केले आहे. व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेस हे अ‍ॅप आधीच सादर करण्यात आले असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या अनुषंगाने याच अ‍ॅपमध्ये प्रॉडक्ट कॅटलॉगची सुविधा देण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत कोणत्याही बिझनेस अकाऊंटसोबत चॅट करतांना संबंधीत प्रतिष्ठानाच्या उत्पादनांची वर्गीकृत माहिती कॅटलॉगच्या स्वरूपातून पाहता येणार आहे. सध्या ई-कॉमर्स कंपन्यांची संकेतस्थळे अथवा अ‍ॅप्सवर या प्रकारचे कॅटलॉग्ज असून याचाच कित्ता व्हाटसअ‍ॅप गिरवणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

व्हाटसअ‍ॅपला व्यवसायाचा आयाम देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे आधीच अधोरेखीत झालेले आहे. या अनुषंगाने प्रॉडक्ट कॅटलॉगचे फिचर हे महत्वपूर्ण मानले जात आहे. याच्या जोडीला व्हाटसअ‍ॅपचे एसडीके म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट हे थर्ड पार्टीजसाठी खुला करण्यात आला असून याच्या मदतीने कुणीही आपल्या व्हाटसअ‍ॅप अकाऊंटला कुठेही लॉगीन करण्यासाठी ऑथेंटीकेशन टुल म्हणून वापरू शकतो. अर्थात आता ओटीपीसाठी एसएमएसला व्हाटसअ‍ॅपचा मॅसेज हा सक्षम पर्याय समोर येणार आहे. याशिवाय, फेसबुकने काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या पोर्टल या स्मार्ट डिस्प्लेवरून आता व्हाटसअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करता येणार आहे. हा कॉल एंड-टू-एंड एनक्रिप्शनच्या माध्यमातून सुरक्षित केलेला असेल. तसेच मार्क झुकरबर्ग यांनी भारतात प्रयोगात्मक अवस्थेत असणार्‍या व्हाटसअ‍ॅपच्या पेमेंट सिस्टीमला जगातील अन्य देशांमध्ये लाँच करण्याचे सूतोवाचदेखील या कार्यक्रमात केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here