गुगल असिस्टंट, डिस्कव्हर, लेन्स व बोलोमध्ये आता मराठीचा सपोर्ट !

0

गुगलने आपल्या गुगल असिस्टंट, डिस्कव्हर, लेन्स आणि बोलो या सेवांसाठी आता मराठी भाषेचा सपोर्ट प्रदान करण्याची घोषणा केली आहे.

गुगलने आज गुगल फॉर इंडिया-२०१९ या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात ही कंपनी बंगळुरू येथे नवीन संशोधन केंद्र व कृत्रीम बुध्दीमत्ता अध्ययन केंद्र (एआय लॅब) सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासोबत गुगलने बीएसएनएलसोबत सहकार्याचा करार करून ग्रामीण भागात वाय-फाय इंटरनेटची सुविधा पुरवण्याची घोषणादेखील केली. तसेच व्होडाफोन-आयडियाच्या मदतीने एक स्वतंत्र क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून यावरून गुगल असिस्टंटच्या मदतीने युजरला हवी ती माहिती मिळणार आहे.

याच्या जोडीला गुगलने भारतीय भाषांसाठीदेखील महत्वाच्या घोषणा केल्या. यात प्रामुख्याने अनेक सेवांचा विस्तार करण्यात आला. यातील लक्षणीय बाब म्हणजे गुगल असिस्टंट या व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीवर आधारित व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटला मराठीचा सपोर्ट देण्यात आला आहे. अर्थात, आता कुणीही या असिस्टंटला मराठीत आज्ञा देऊन हव्या त्या फंक्शनचे कार्यान्वयन करू शकतो. डिस्कव्हर या सेवेतही मराठीचा सपोर्ट आलेला आहे. महत्वाचे म्हणजे गुगल लेन्स वा व्हिज्युअल सर्च टुलमध्येही मराठीचा वापर करता येणार आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातून विविध वस्तू आणि यावरील मजकूर हा मराठीत अनुवादीत करून मिळणार आहे. तर बोलो या ध्वनीवर आधारित सेवेतही मराठीचा सपोर्ट दिलेला आहे. या सर्व सेवांच्या ताज्या अपडेटमध्ये मराठीचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here