टाटा नेक्सॉन ईव्हीचे अनावरण : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

टाटा मोटर्सने आपल्या नेक्सॉन ईव्ही या मॉडेलचे अनावरण केले असून या माध्यमातून देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रीकवर चालणारी एसयुव्ही सादर केली आहे.

गत अनेक महिन्यांपासून टाटा नेक्सॉनच्या इलेक्ट्रीकवर चालणार्‍या आगामी व्हेरियंटबाबत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण होते. या अनुषंगाने मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. हे मॉडेल एक्सझेड प्लस लक्स; एक्सझेड प्लस आणि एक्सएम या तीन व्हेरियंटच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले असून याचे एक्स-शोरूम मूल्य १५ ते १७ लाखांच्या दरम्यान असणार आहे. हे मॉडेल जानेवारीत प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणार असून याची कंपनीच्या संकेतस्थळावर अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

नेक्सॉन ईव्ही या मॉडेलमध्ये ३२.२ केव्ही क्षमतेची लिथीयम आयन बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत धावत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात फास्ट चार्जींग तंत्रज्ञानामुळे डीसी चार्जर लावल्यास अवघ्या ६० मिनिटांमध्ये ८० टक्के इतके चार्जींग होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर १५ अँपिअर क्षमतेच्या कोणत्याही प्लगमधून ही बॅटरी चार्ज करणे शक्य आहे. यातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात ३५ मोबाईल अ‍ॅप्सची कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. याच्या मदतीने रिमोट कमांड, नेव्हिगेशनपासून ते अन्य विविध फंक्शन्सचा वापर करता येणार आहे.

यातील बहुतांश अन्य फिचर्स हे मूळ नेक्सॉनप्रमाणेच आहेत. याची डिझाईन ही अतिशय आकर्षक अशी करण्यात आलेली आहे. आतील भागाचा विचार केला असता, यामध्ये ७ इंच आकारमानाची इन्फोटेनमेंट सिस्टीम असून याला हर्मनच्या ऑडिओ सिस्टीमची जोड दिलेली आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले या दोन्ही सिस्टीमचा सपोर्ट दिलेला आहे. यात ड्राईव्ह आणि स्पोर्टस् हे दोन ड्रायव्हींग मोड प्रदान करण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here