टेक्नोचा इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर व ट्रिपल रिअर कॅमेर्‍याने युक्त स्मार्टफोन

0

टेक्नो कंपनीने फँटम ९ हा स्मार्टफोन लाँच केला असून यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांसह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

टेक्नो फँटम ९ या मॉडेलचे मूल्य १४,९९९ रूपये असून १७ जुलैपासून फ्लिपकार्टवरून याला उपलब्ध करण्यात येणार आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार यामध्ये इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. अर्थात, याच्या डिस्प्लेवरच बोटाचा ठसा अंकीत करून युजर हा स्मार्टफोन अनलॉक करू शकेल. हे याचे वैशिष्ट्यपूर्ण फिचर मानले जात आहे. याशिवाय, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. याच्या अंतर्गत, १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून जोडीला ८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगल लेन्सयुक्त तर २ मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सरयुक्त कॅमेरे दिले आहेत. यात एआययुक्त फिचर्सदेखील दिले असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

टेक्नो फँटम ९ या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस ( २३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये मीडियाटेकचा हेलीओ पी ३५ हा प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीपासून विकसित केलेल्या हायओएस ५.० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here