टेलीग्राम अ‍ॅपवर व्हिडीओ एडिटींगची सुविधा

0

टेलीग्राम अ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी व्हिडीओ एडिटर प्रदान केला असून याच्या जोडीला टु-स्टेप ऑथेंटीकेशनचे फिचर देखील कार्यान्वित केले आहे.

टेलीग्राम अ‍ॅपच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने वाढत आहे. व्हाटसअ‍ॅप वा टिकटॉक प्रमाणे याचे युजर्स प्रचंड गतीने वाढत नसले तरी याला जुडणार्‍या युजर्सच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमिवर टेलीग्रामने आपल्या युजर्सला अनेक नवनवीन फिचर्स देण्यास प्रारंभ केला आहे. यात अजून काही नवीन फिचर्सची भर पडली असून एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, टेलीग्राममध्ये अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने व्हिडीओ एडिटरचा समावेश आहे. याच्या मदतीने युजर आपल्या व्हिडीओचा ब्राईटनेस अ‍ॅडजस्ट करण्यासह व्हिडीओत सुधारणा करू शकतो. या एडिटरच्या मदतीने फोटो वा व्हिडीओवर रेखाटन करता येणार आहे. यामुळे ते अधिक आकर्षक होतील. तसेच यात झूमची सुविधा देखील दिलेली आहे. यात फोटो आणि व्हिडीओवर अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स लावण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. जीआयएफ पॅनलमध्ये जीआयएफ या प्रकारातील प्रतिमा सर्च करण्याची सुविधा देखील आता युजर्सला मिळणार आहे. यात सध्या लोकप्रिय असणार्‍या ट्रेंडींग जीआयएफ प्रतिमा देखील शोधता येतील. तर अँड्रॉइड युजर्सला स्मूथ अ‍ॅनिमेशन्स हे स्वतंत्र फिचर वापरण्यासाठी मिळणार असून यात ३० सेकंदापर्यंतच्या व्हिडीओला लूप व्हिडीओत सहजपणे परिवर्तीत करता येईल.

या सर्व फिचर्सच्या जोडीला टेलीग्राममध्ये आता ‘टु-स्टेप-ऑथेंटीकेशन’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. टेलीग्राम हे आधीच सुरक्षित असून या प्रणालीमुळे याच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here