ब्ल्यू-व्हेल पेक्षाही खतरनाक आहे टिकटॉकवरील ‘हे’ चॅलेंज !

0

ब्ल्यू-व्हेल गेमपेक्षा अतिशय भयंकर असणारे खूळ टिकटॉकवर अवतरले असून यापासून बालकांचा बचाव करण्याचा इशारा तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.

गत वर्षी ब्ल्यू-व्हेल गेमची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यात विविध टास्क आणि चॅलेंजच्या माध्यमातून स्वत:ला इजा करण्यासाठी उद्देपीत केले जात असे. यातील सर्वात शेवटचे चॅलेंज हे आत्मघात असून यामुळे काही टिज एजर्स मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर जगभरातील विविध देशांची सरकारे व टेक कंपन्यांनी एकत्रीत प्रयत्न करून ब्ल्यू-व्हेल गेमच्या प्रचार-प्रसाराला आवर घातला. असे असले तरी आता वेगवेगळ्या डिजीटल मंचांवरून ही विकृती अधून-मधून समोरच येत असल्याचे दिसून आले आहे. यात आता टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपची भर पडली आहे.

टिकटॉक अ‍ॅप जगभरात तुफान लोकप्रिय आहे. विशेष करून कुमारवयीन मुलांमध्ये याचे खूळ मोठ्या प्रमाणात पसरले आहे. व्हाटसअ‍ॅपने अलीकडेच दोन अब्ज युजर्सचा टप्पा पार केला असून टिकटॉकही याच्या पाठोपाठ सुसाट गतीने व्हाटसअ‍ॅपला मागे टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, टिकटॉक हे अ‍ॅप युजरची गोपनी माहिती चीन सरकारला देत असल्याचे आरोप आधीच करण्यात आलेले आहेत. या अ‍ॅपवर व्हिडीओ तयार करतांना अनेक जणांचे जीव गेल्याच्या बातम्यादेखील आपण वाचल्या असतील. यामुळे जगभरात टिकटॉक हे चिंतेचा विषय बनले आहे. अर्थात, टिकटॉकच्या उपद्रवात भर टाकण्यासाठी अजून एक नवीन चॅलेंज समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

टिकटॉकवर सध्या ‘स्कलब्रेकर चॅलेंज’ आलेले आहे. यात एक जण मध्यभागी उभा असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन जण असतात. यातील मध्यभागी उभा असणारा उंच उडी मारतो. तर त्याचे पाय जमीनीवर टेकणार त्याच क्षणाला बाजूला असणारे दोन्ही जण त्याच्या पायाला लाथ मारतात. साहजीकच उडी मारणार्‍याचा बॅलन्स जाऊन तो खाली कोसळतो. यात खाली कोसळणार्‍याने पाठीवर पडायचे चॅलेंज यात देण्यात आलेले आहे. मात्र हे काम इतके कठीण आहे की, यामुळे बहुतांश जणांच्या पाठीचा कणा आणि डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका आहे. मात्र असे असले तरी बरेच तरूण हे चॅलेंज पूर्ण करण्याचा आटापीटा करत असल्याचे दिसून आले आहे. हा ट्रेंड नेमका कुठून आणि कसा सुरू झाला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यात व्हेनेझुएलातील एका विद्यार्थ्याला तर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यात सहभागी होणार्‍यांना अपंगत्व येण्याचा धोका असून यात त्यांचा प्राणदेखील जाण्याची भिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये टिकटॉकवरील स्कलब्रेकर चॅलेंज व्हायरल झाले असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढलेले आहे. टिकटॉकवरील हे खूळ अतिशय धोकादायक असून याबाबत अनेक शाळांनी आपले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यापासून बचाव करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

खालील व्हिडीओ हा ‘स्कलब्रेकर चॅलेंज’ हे चॅलेंज किती भयंकर आहे हे दर्शविण्यासाठी दिलेला आहे. आपण याला फॉलो करू नका. अथवा कुणी करत असल्यास प्रतिकार करा.

( हे वृत्त जनजागृतीसाठी देण्यात आले असून आपण सर्वांनी याबाबत जनजागृती करावी ही अपेक्षा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here