उबरचा फूड डिलीव्हरीतून काढता पाय

0

उबरने आपली उबर इटस् ही सेवा झोमॅटोला विकली असून फूड डिलीव्हरी क्षेत्रातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

उबर ही अ‍ॅपवर आधारित रायडिंग सेवा भारतात तुफान लोकप्रिय आहे. या क्षेत्रात ओला सारख्या अन्य कंपन्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न करूनदेखील उबर पहिल्या क्रमांकावर असून या कंपनीचा वाटा खूप मोठा आहे. दरम्यान, उबरने २०१७ साली उबर इटस् ही नवीन सेवा सुरू केली होती. याच्या अंतर्गत फूड डिलीव्हरी करण्यात येत होती. खर तर उबर इटसला चांगला प्रतिसाद लाभला होता. तथापि, याच क्षेत्रातील झोमॅटो आणि स्वीगी या कंपन्यांच्या आव्हानाला उबर इटस तोंड देऊ शकले नाही. व्यवसाय वृध्दीसाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने अखेर या क्षेत्रातून उबरने काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने उबर इटसला झोमॅटोने अधिग्रहीत केले आहे. हा सौदा नेमका किती रकमेत झाला याची माहिती समोर आलेली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार ३५ कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे २४९२ कोटी रूपयांमध्ये झोमॅटोने उबर इटस खरेदी केल्याचे समजते.

झोमॅटोमध्ये अलीकडेच अलीबाबाची मालकी असणार्‍या एएनटी कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. याचाच वापर उबर इटसची खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उबर इटसच्या अ‍ॅपवर आता झोमॅटोने अधिग्रहीत केल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थात, काही दिवस तरी या अ‍ॅपचे स्वतंत्र अस्तित्व राहणार असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here