विवोची सॅमसंगवर मात; भारतात दुसर्‍या क्रमांकावर मुसंडी

0

विवो कंपनीने सॅमसंगला मागे टाकून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत दुसर्‍या क्रमांकावर मुसंडी मारली असून शाओमीने पहिले स्थान अबाधित राखले आहे.

२०१९ वर्षाची अखेरची तिमाही म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या स्मार्टफोन विक्रीचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यावरून काऊंटरपॉईंट या संस्थेने सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार शाओमीने तब्बल २७ टक्के मार्केट शेअरसह आपला पहिला क्रमांक कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे शाओमीने लागोपाठ दहाव्या तिमाहीत पहिल्या क्रमांकावरील कब्जा कायम ठेवला आहे. दरम्यान, आधीच्या तिमाहीत दुसर्‍या क्रमांकावर असणारी सॅमसंग कंपनी तिसर्‍यावर फेकली गेली आहे. तर चीनचीच विवो ही दुसर्‍या क्रमांकावर आली आहे. गत तिमाहीत विवोने २१ टक्के बाजारपेठ काबीज करत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर सॅमसंगकडे सध्या १९ टक्के इतका शेअर आहे. उर्वरति चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे ओप्पो आणि रिअलमी या दोन कंपन्या विराजमान झाल्या आहेत. अर्थात, सॅमसंगचा अपवाद वगळता भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेतील टॉपच्या सर्व कंपन्या चीनी असल्याचे या अहवालातून अधोरेखीत झाले आहे.

विवो कंपनीने मिड रेंज अर्थात १५ ते २० हजार रूपयांच्या दरम्यान विविध मॉडेल्स सादर केले असून याला भारतीय ग्राहकांची पसंती मिळाली आहे. यामुळे सॅमसंगच्या दुसर्‍या क्रमांकावर या कंपनीने कब्जा केल्याचे दिसून येत आहे. यंदा अर्थात २०२०च्या पहिल्या तिमाहीतदेखील हाच ट्रेंड दिसून आल्यास सॅमसंगसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here