३२ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने युक्त विवो एस १ दाखल

0

विवोने तब्बल ३२ मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज असणारा एस १ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

विवो एस १ या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यातील लक्षणीय फिचर म्हणजे यातील फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा ३२ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार सेल्फी घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याचे अपर्चर एफ/२.० असून यात एचडीआरचा सपोर्ट दिलेला आहे. बर्‍याच ग्राहकांसाठी फ्रंट कॅमेरा महत्वाचा असतो. या पार्श्‍वभूमिवर, हा कॅमेरा युजर्सच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला असून यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा आहे. याला ८ मेगापिक्सल्सच्या अल्ट्रा वाईड लेन्सयुक्त तर २ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरयुक्त कॅमेर्‍यांची जोड देण्यात आलेली आहे. यात एआर स्टीकर्स, एआय फेस ब्युटी आणि स्लो-मोशन व्हिडीओ रेकॉर्डींगची सुविधा दिलेली आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उत्तम प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, यात ६.३८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस ( २३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा व १९:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. या डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. अर्थात, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर हे महत्वाचे फिचर प्रदान करण्यात आले आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ पी ६५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याला ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य १७,९९०); ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (मूल्य १८,९९०) आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य १९,९९० ) अशा तीन व्हेरियंटच्या माध्यमातून याला उपलब्ध करण्यात आलेले आहे. अमेझॉन इंडिया आणि विवोच्या ई-स्टोअरवरून यांना उपलब्ध करण्यात आले आहे. यातील बॅटरी ४,५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या फनटच ओएस ९ या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here