ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त विवो झेड१एक्स

0

विवो कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त असणारा विवो झेड१एक्स हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सध्या ४८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यासह मल्टीपल कॅमेर्‍यांचा सेटअप असणारे विविध मॉडेल्स बाजारपेठेत सादर करण्यात येत आहेत. यात आता विवो झेड१एक्स या मॉडेलची भर पडली आहे. याच्या मागील बाजूस तीन कॅमेरे दिलेले आहेत. यातील प्रमुख कॅमेरा सोनी आयएमएक्स५८६ हा असून याची क्षमता तब्बल ४८ मेगापिक्सल्सची आहे. याच्या जोडीला अल्ट्रा वाईड अँगलने युक्त असणारा ८ मेगापिक्सल्सचा आणि डेप्थ सेन्सर असणारा २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच युजर इंटरफेस दिलेला आहे. तसेच यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी ४,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, विवो झेड१एक्स या मॉडेलमध्ये ६.३८ इंच आकारमानाचा व सुपर अमोलेड या प्रकारातील आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याच्या वरील भागात हॉलो नॉच दिला असून यावर इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१२ हा प्रोसेसर आहे. याचे ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे १६,९९० आणि १८,९९० रूपये असून याला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here