गुगल मॅप्सवर ध्वनी अनुवादाची सुविधा

0
गुगल मॅप्स, google maps

गुगल मॅप्सने आता कोणत्याही भाषेतील भौगोलिक स्थळांना अनुवाद करून ऐकण्याची सुविधा देणारे फिचर आपल्या युजर्ससाठी सादर केले आहे.

गुगल मॅप्स हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे यात दुमत असू शकत नाही. हे अ‍ॅप जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. अलीकडेच यावर व्हाईस नेव्हीगेशनच्या माध्यमातून अधू दृष्टी असणार्‍यांना सुविधा प्रदान करणारे फिचर देण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपवरून प्रोफाईल अद्ययावत करण्याची सुविधा दिलेली आहे. यानंतर आता मॅप्सवर अनुवादाचे फिचर देण्यात आले असून एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे.

यानुसार आता गुगल मॅप्सवर कोणत्याही विदेशी भाषेतील भौगोलिक स्थळांचे लोकेशन हे युजरला आपल्या भाषेत ऐकता येणार आहे. यासाठी गुगल मॅप्सच्या अ‍ॅपमध्ये स्पीकरचा नवीन आयकॉन देण्यात येणार आहे. हे चिन्हे भौगोलिक स्थळ अथवा पत्त्याच्या समोर असेल. यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणाला हव्या त्या भाषेत ऐकता येईल. यात युजर हव्या त्या भाषेसाठी सेटींग करू शकतो. यामुळे समजा आपण मॅप्समध्ये मराठी भाषा सेट केलेली आहे. आणी आपण जपानमध्ये गेलेलो आहोत. तर जपानमध्ये मॅप्स पाहतांना एखाद्या ठिकाणाला जपानी भाषेत नेमके काय म्हणतात हे त्या स्पीकरच्या आयकॉनवर क्लिक करून ऐकता येईल. यासाठी टेक्स्ट-टू-स्पीच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गुगल मॅप्सच्या अनुवादाचे हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीसाठी सादर करण्यात येत आहे. लवकरच दोन्ही प्रणालींना अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये गुगल मॅप्सच्या अनुवादाचे फिचर नेमके कसे कार्य करेल याला दर्शविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here