व्हाटसअ‍ॅपचे दोन अब्ज युजर्स !

0

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरचे दोन अब्ज युजर्स झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून हा टप्पा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे.

संपूर्ण जगभरात व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून प्रत्येक क्षणाला नवनवीन युजर्स याच्याशी जुळत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, व्हाटसअ‍ॅपने दोन अब्ज अर्थात २०० कोटी युजर्सचा महत्वाचा टप्पा पार केल्याची अधिकृत माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे दोन अब्ज युजर्स असणार्‍या मोजक्या अ‍ॅप्समध्ये व्हाटसअ‍ॅपचा समावेश झाला आहे. व्हाटसअ‍ॅपची मालकी मार्क झुकरबर्ग यांच्याकडे आहे. त्यांच्याच मालकीच्या फेसबुकचे अडीच अब्ज युजर्स असून इन्स्टाग्रामही दीड अब्जच्या उंबरठ्यावर उभे आहे. अर्थात, फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅप या चार सेवांच्या माध्यमातून मार्क झुकरबर्ग याच्याकडे पृथ्वीतलावरील सर्वाधीक लोकांचा डाटाबेस असल्याची बाब कुणाला नाकारता येणार नाही.

दोन अब्ज युजर्सचा टप्पा पार पाडल्याप्रित्यर्थ जारी करण्यात आलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये व्हाटसअ‍ॅपने आपल्या एंड-टू-एंड एनक्रिप्शनच्या मदतीने भविष्यातही युजर्सच्या माहितीच्या गोपनीयतेला प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या मॅसेंजरच्या मदतीने आप्तजनांशी कायम कनेक्ट राहण्यासह अत्याधुनीक कार्यसंस्कृतीचा अवलंब करता येत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे व्हाटसअ‍ॅपने व्यावसायिक संधीचे एक मोठे दालन उघडले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

कनेक्ट द वर्ल्ड प्रायव्हेटली या ध्येयवाक्यानुसार व्हाटसअ‍ॅप हे आपल्या युजर्सला सुलभ आणि आत्यंतीक सुरक्षित असे माध्यम उपलब्ध करून देत असून भविष्यातही याच प्रकारे युजर्सच्या सेवेत कार्यरत राहणार असल्याची ग्वाही व्हाटसअ‍ॅपच्या या ब्लॉग पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here