व्हाटसअ‍ॅपवर येणार कॉल वेटींग फिचर

0

व्हाटसअ‍ॅपने अँड्रॉइड युजर्ससाठी कॉल वेटींग हे फिचर सादर केले असून पहिल्या टप्प्यात याला प्रयोगात्मक अवस्थेत उपलब्ध करण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपने अलीकडेच आपल्या आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी कॉल वेटींग हे फिचर सादर केले होते. आता हीच सुविधा अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. व्हाटसअ‍ॅपची २.१९.३५७ ही बीटा अर्थात प्रयोगात्मक आवृत्ती नुकतीच सादर करण्यात आली असून यामध्ये हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. आपण स्मार्टफोनवरून बोलत असतांना अन्य व्यक्तीचा कॉल आल्यास कॉल वेटींगच्या सुविधेमुळे याची माहिती आपल्याला मिळत असते. अगदी याच प्रकारे व्हाटसअ‍ॅपवरून व्हाईस कॉल करतांनाही कॉल वेटींगच्या सुविधेमुळे नेमका कुणाचा कॉल वेटींगवर आहे याची माहिती त्या युजरला मिळणार आहे. वर नमूद केल्यानुसार ही सुविधा पहिल्यांदा बीटा आवृत्तीच्या युजर्सला मिळणार असून लवकरच सर्व युजर्ससाठी याचे अपडेट सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला अलीकडेच काही नवीन फिचर्स मिळाले आहेत. यात कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठीची प्रायव्हसी सेटींग युजरला प्रदान करण्यात आली आहे. तर डार्क मोडदेखील सर्वांना लवकरच वापरण्यासाठी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर यासोबत बीटा युजर्ससाठी बॅटरी सेव्हर मोड आणि डार्क थीमवर अवतार म्हणून कोणतीही इमेज सेट करून वापरण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे फिचर्स सर्व युजर्ससाठी लवकरच सादर करण्यात येतील असे आता स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here