व्हाटसअ‍ॅपला मॅसेंजर रूम्ससोबत कनेक्ट करता येणार

0

व्हाटसअ‍ॅपला अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या मॅसेंजर रूम्स या अ‍ॅपसोबत कनेक्ट करता येणार असून ताज्या बीटा आवृत्तीत याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकने गेल्या महिन्यातच मॅसेंजर रूम्स या नावाने स्वतंत्र अ‍ॅप लाँच केले असून यात ग्रुप व्हिडीओ कॉलींगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे अ‍ॅप लाँच करतांनाच याला व्हाटसअ‍ॅपशी संलग्न करण्याची सुविधा मिळणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले होते. आता ही सुविधा लवकरच युजर्सला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या सर्व आगामी फिचर्सबाबत तंतोतंत भाकिते करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार लवकरच व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला मॅसेंजर रूम्स अ‍ॅपशी अतिशय सुलभ पध्दतीत कनेक्ट होता येणार आहे. मॅसेंजर रूम्सला कनेक्ट होण्यासाठी व्हाटसअ‍ॅपमध्ये दोन मार्ग दिलेले आहेत. यातील पहिल्यात कॉल या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर खाली फोन कॉलच्या आयकॉनच्या वर कॅमेर्‍याचा आयकॉन दिलेला असेल. येथे क्लिक करून कुणीही मॅसेंजर रूम्सशी संलग्न होऊ शकतो. तर पर्सनल चॅटमध्ये कॅमेर्‍याच्या पर्यायाऐवजी रूम्सचा ऑप्शन देण्यात येणार आहे. यातील अन्य पर्याय हे आधीप्रमाणेच म्हणजे डॉक्युमेंट, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन व कॉन्टॅक्ट हे राहणार आहेत. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कुणीही सहजपणे रूम्सशी कनेक्ट होऊ शकणार आहे. या अ‍ॅपवर गेल्यानंतर कुणीही नवीन रूम तयार करू शकतो, अथवा आधीच्या रूमला कनेक्ट होऊन त्या ग्रुप व्हिडीओ कॉलींगमध्ये सहभागी होऊ शकतो. तर दुसरीकडे मॅसेंजर रूम्समध्ये आता ग्रुप व्हिडीओ कॉलींगची मर्यादा ५० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड बीटा प्रोग्रॅममध्ये सहभागी झालेल्या युजर्ससाठी २.२०.१६० ही नवीन प्रयोगात्मक आवृत्ती सादर केली असून याच्या युजर्सला मॅसेंजर ग्रुप्सचे इंटिग्रेशन झाल्याचे दिसून येत आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे फिचर अद्याप प्रयोगात्मक अवस्थेत असून येत्या काही महिन्यांमध्ये याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here