व्हाटसअ‍ॅपच्या ऑडिओ-व्हिडीओ ग्रुप कॉलींगची मर्यादा वाढणार

0

जगभरात ग्रुप कॉलींगमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असतांना आता व्हाटसअ‍ॅपनेही आपल्या ऑडिओ व व्हिडीओ ग्रुप कॉलींगच्या मर्यादेत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

कोरोनाच्या प्रकोपामुळे वर्क फ्रॉम होम या प्रणालीला गती मिळाली आहे. यात ऑडिओ व व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलींग हा अविभाज्य घटक आहे. तर, सध्या जगातील बर्‍याचशा देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने आपल्या आप्तांसोबत ग्रुप कॉलींग करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी टेक कंपन्या सरसावल्या आहेत. यात आता व्हाटसअ‍ॅपची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर, व्हाटसअ‍ॅपवर आधीच ग्रुप कॉल व ग्रुप व्हिडीओ कॉल्स करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तथापि, सध्या यात फक्त चार युजर्स एकमेकांशी ऑडिओ वा व्हिडीओ कॉल्स करू शकतात. ही मर्यादा वाढणार असल्याचे संकेत मिळाले असून व्हाटसअ‍ॅपच्या आगामी सर्व फिचर्सची अचूक भाकिते करणार्‍या व्हाटसअ‍ॅप बीटा इन्फो या संकेतस्थळाने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

व्हाटसअ‍ॅपच्या बीटा युजर्ससाठी जारी करण्यात आलेल्या व्ही२.२०.१२८ आणि व्ही२.२०.१२९ या दोन आवृत्त्यांच्या कोडचे अध्ययन केल्यानंतर या मॅसेंजर अ‍ॅपवर लवकरच वाढीव प्रमाणात ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येतील असे व्हाटसअ‍ॅप बीटा इन्फोच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. हा नवीन कॉन्फरन्स कॉल सुरू असतांना याच्या वर एक हेड दर्शविले जाणार असून या माध्यमातून करण्यात आलेला ऑडिओ/व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल हा एंड-टू-एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असल्याचे युजर्सला समजणार आहे. अर्थात, युजर्सची संख्या वाढली तरी या प्रकारचे कॉन्फरन्स कॉल्स हे सुरक्षित असतील हे यातून अधोरेखीत झाले आहे. दरम्यान, ग्रुप कॉलींगच्या युजर्सची संख्या वाढणार असली तरी ती नेमकी किती असेल याबाबत मात्र अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे फिचर लवकरच प्रयोगात्मक आवृत्तीसाठी व नंतर सर्व युजर्ससाठी प्रदान करण्यात येणार असल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here