क्युआर कोडच्या मदतीने व्हाटसअ‍ॅपवर कॉन्टॅक्ट सेव्ह/शेअर करता येणार

0

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच क्युआर कोडचा वापर सुरू होणार असून याच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट क्रमांक जोडण्यासह शेअर करण्याची सुविधा सुलभपणे पार पाडता येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने क्युआर कोडच्या मदतीने कॉन्टॅक्ट क्रमांक सेव्ह व शेअर करण्यासाठीची सुविधा प्रदान करण्याचे संकेत जवळपास दीड वर्षांपूर्वीच दिले होते. याची व्यापक प्रमाणात चाचणी घेण्यात आली असून आता हे फिचर युजरला प्रत्यक्षात वापरण्यासाठी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर, क्युआर कोडचा वापर हा सध्या विपुल प्रमाणात करण्यात येत आहे. यात पेमेंट सिस्टीमपासून ते विविध युटीलिटीजचा समावेश आहे. व्हाटसअ‍ॅपला वेबवरून वापरतांना क्युआर कोडचा वापर कधीपासूनच सुरू करण्यात आला आहे. यात आता हे नवीन फिचर येणार आहे. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे भाकिते करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

सध्या आपण कोणत्याही स्मार्टफोनमध्ये नवीन संपर्क क्रमांक सेव्ह केल्यानंतर तो व्हाटसअ‍ॅपवर आहे की नाही? याची माहिती मिळत असते. आपल्या स्मार्टफोनवर असणार्‍या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाण्याऐवजी थेट व्हाटसअ‍ॅपवरून कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याची सुविधा आधीपासूनच देण्यात आलेली आहे. याला आता नवीन स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. प्रोफाईल सेटींगमध्ये यासाठी स्वतंत्र भाग देण्यात येणार आहे. यामध्ये संबंधीत क्रमांक टाकल्यानंतर तो व्हाटसअ‍ॅपवर आहे की नाही हे लागलीच समजणार आहे. तर कुणीही आपल्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकाला क्युआर कोडच्या स्वरूपात सेव्ह करू शकणार आहे. हाच क्युआर कोड स्कॅन करून समोरचा युजर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये क्रमांक सेव्ह करू शकणार आहे. तसेच याच्या मदतीने क्रमांक शेअर देखील करता येणार आहे. ही प्रणाली पहिल्यांदा बीटा युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आली असून लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात येणार असल्याचे WaBetaInfo च्या या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपचे हे नवीन फिचर विशेष करून व्हाटसअ‍ॅप फॉर बिझनेसच्या ग्राहकांना अतिशय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने पटकन कोणताही क्रमांक स्कॅन करून सेव्ह वा शेअर करून संबंधीत ग्राहकाच्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी हे फिचर सुविधाजनक ठरणार आहे. तर व्हाटअ‍ॅपच्या आगामी पेमेंट सिस्टीम तसेच मल्टी डिव्हाईस सपोर्ट साठी देखील क्युआर कोडचा वापर करण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, सध्या तरी याबाबत व्हाटसअ‍ॅपने कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here