शाओमीने किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा रेडमी ८ए ड्युअल हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.
शाओमीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारल्यानंतर आक्रमक रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, आज रेडमी ८ए ड्युअल हे मॉडेल आज ग्राहकांना सादर करण्यात आले. याआधी बाजारपेठेत असणार्या रेडमी ८ए या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. याला २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ६,४९९ आणि ६,९९९ रूपये या मूल्यांमध्ये सादर करण्यात आले आहे.
रेडमी ८ए ड्युअल या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात डॉट नॉच या प्रकारातील डिस्प्ले असून यावर स्क्रॅच रेझिस्टन्स ग्लासची कोटींग प्रदान करण्यात आली आहे. तर पी२आय कोटींगमुळे याला पाण्यातही वापरता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या मॉडेलमध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट दिलेला आहे. यामुळे यात दोन सीमकार्डसह एक मायक्रो-एसडी कार्डचा वापर करता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.