१०८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने युक्त शाओमी ‘मी १० फाईव्ह जी’ स्मार्टफोन

0

शाओमीने आधी जाहीर केल्यानुसार आपला मी १० फाईव्ह जी हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून यात तब्बल १०८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यासह अनेक सरस फिचर्स आहेत.

शाओमीने काही दिवसांपूर्वीच मी १० फाईव्ह जी हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार यातील सर्वात आकर्षक फिचर म्हणजे यातील कॅमेरा होय. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन्समधील कॅमेरे ४८ मेगापिक्सल्सचे असून काहींमध्ये ६४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. तथापि शाओमी मी १० या मॉडेलच्या माध्यमातून पहिल्यांदाच तब्बल १०८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने युक्त मॉडेल ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. खरं तर याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप असून यातील प्रमुख लेन्स ही एफ/१.६९ अपर्चरयुक्त १०८ मेगापिक्सल्स क्षमतेची आहे. याला १३ मेगापिक्सल्सची वाईड अँगल लेन्स; २ मेगापिक्सल्सचे डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सल्सच्याच मॅक्रो लेन्सची जोड देण्यात आलेली आहे. या चारही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता या मॉडेलमध्ये ६.६७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा थ्रीडी कर्व्हड सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८६५ हा वेगवान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याचे ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट अनुक्रमे ४९,९९९ आणि ५४९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात १२ जीबी रॅमचे व्हेरियंट असले तरी ते अद्याप भारतात लाँच करण्यात आलेले नाही.

मी १० फाईव्ह जी हे मॉडेल अँड्रॉईड १० पासून विकसित करण्यात आलेल्या मीयुआय ११ या युजर इंटरफेसवर चालणारे आहे. ३० वॅट वायरलेस चार्जरयुक्त यातील बॅटरी ४७३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यामध्ये रिव्हर्स वायलेस चार्जींगची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. तर नावातच नमूद असल्यानुसार या मॉडेलमध्ये फोर-जी सोबत फाईव्ह-जी नेटवर्कचा सपोर्टदेखील आहे. भारतात अद्याप ही सेवा सुरू झाली नसली तरी याची सुविधा असणारे मॉडेल लाँच करून शाओमीने स्पर्धेत आघाडी घेतल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here